जेवणाच्या कारणावरुन ढाब्यावर मारहाण, परस्पर विरोधी गुन्हे दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील मौजे मदनसुरी येथे जेवणाच्या कारणावरून ढाब्याबर मारहाणीची घटना घडली. या प्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. ढाबा चालक आणि त्याच्या मुलास व इतर ग्राहकांना काठीने, लाथाबुक्यांनी मारहाण केल्या प्रकरणी चारजणांविरुध्द तर ढाबा चालक आणि त्याच्या मुलाने काठीने आणि हत्याराने मारहाण केल्याप्रकरणी कासारशिरसी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

शिवाजी केरनाथ जाधव रा.मदनसुरी यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, कांत विश्वनाथ भालके आणि त्याच्यासोबत इतर तिघे फिर्यादीच्या ढाब्यावर आले होते. जेवणाच्या कारणावरून त्यांनी फिर्यादी व त्याच्या मुलास आणि इतर ग्राहकांना काठीने, लाथाबुक्यांनी मारहाण केली. चारजणांविरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस कर्मचारी गोणे हे करीत आहेत.

दरम्यान कांत विश्वनाथ भालके यांनी दिलेल्या तक्रारीवरून शिवाजी जाधव आणि इतर दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भांडणाची कुरापत काढून फिर्यादी काठीने आणि हत्याराने मारहाण करून जखमी केले. फर्यादीच्या कारची मोडतोड करून एक लाख रुपयांचे नुकसान केले. जीवे मारण्याची धमकी दिली. म्हणून तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.