
>> तुषार चव्हाण (सौंदर्य तज्ञ)
सध्या कोरोना काळात ब्युटी पार्लरमध्ये जाऊन सौंदर्योपचार करण्याची बंदी आहे आणि लोकांमध्ये भीतीही आहे. काही ब्युटी पार्लर्स योग्य ती काळजी घेऊन सौंदर्योपचार देत आहेत, पण बऱयाच गोष्टी आपण घरच्या घरीही करू शकतो.
ब्युटी इंडस्ट्री ही अशी इंडस्ट्री आहे, ज्यांचे हातावरचे पोट आहे. रोज करणार आणि रोज खाणार. इथे दिखता है वोही बिकता हे असे आहे. त्यामुळे त्याप्रमाणे आम्ही आमची पार्लर बनवतो, सजवतो. त्याप्रमाणे प्रॉडक्ट ठेवतो. माझ्यासारखे असे बरेच लोक आहेत ज्यांनी फेब्रुवारी, मार्च महिन्यात नवीन पार्लर सुरू केले आहे. फेब्रुवारी महिन्यात मी नवीन पार्लरचे ओपनिंग केले होते आणि त्यावर मी बराच खर्च केला होता. पहिला लॉकडाऊन झाला तेव्हा वाटले, ठीक आहे, 21 दिवसांचा प्रश्न आहे ना… होईल सुरळीत. त्यामुळे सगळे पार्लरवाले निवांत होते. कुटुंबासोबत आनंद घेत होते. घरात वेळ देत होते, पण हळूहळू जेव्हा लॉकडाऊन वाढत गेला तसतशी काळजी वाटायला लागली. बॅंकेचे हप्ते नाही घेतले तरी इंटरेस्ट भरायलाच लागणार. भाडं आलं, इलेक्ट्रिक बिल आलं, पगार, जे प्रॉडक्ट सहा महिन्यांत एक्स्पायर होणार होते ते झाले. या सगळ्या गोष्टी लहान पार्लरपासून मोठय़ा पार्लरपर्यंत सगळ्यांनाच त्याचा फटका बसला. ज्यावेळी पार्लर सुरू केलं तेव्हा सत्तर-पंच्याहत्तर हजारांचा माल फेकून द्यावा लागला, जो दोन-चार महिन्यांत एक्स्पायर होणार होता. त्यानंतर अजून एक प्रश्न निर्माण झाला. सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल झाली, एकाच टॉवेलमध्ये लोकांची दाढी आणि केस कापल्याने सलूनमधून कोरोना जास्त पसरला. पोस्ट व्हायरल झाल्यावर आम्हाला डिस्पोजल वापरणं बंधनकारक झालं. त्यामुळे तो खर्च वाढला. एका ग्राहकामागे दीडशे ते दोनशे रुपयांचा खर्च वाढला. तो खर्च वाढल्यामुळे प्राईज वाढली. चार्जेस वाढवल्यामुळे ग्राहकांवर त्याचा परिणाम झाला. ग्राहक कमी झाले. त्यात ट्रेन बंद असल्यामुळे लांबून येणारा ग्राहक वर्ग बंद झाला. एकंदरीत कोरोनाचा ब्युटी क्षेत्रावर मोठा परिणाम झाला.
काही मोठय़ा कंपन्या त्यांचा व्यवसाय चालवण्यासाठी ज्या जाहिराती चालवतात त्या चुकीच्या आहेत. सलूनमध्ये हायजिन नाहीय अशा पद्धतीने जाहिराती चालवून घरी सर्व्हिस घ्यायला लोकांना भाग पाडतात, पण घरी जाणारी व्यक्ती किती सुरक्षित आहे? बरं, ती व्यक्ती गेल्यावर त्यांच्या घरातले किती सुरक्षित आहेत? ज्या घरात जाणार आहेत ते घर किती सुरक्षित आहे? याउलट सलूनमध्ये प्रत्येक वेळेला निर्जंतुकीकरण होते, सगळे डिस्पोजेबल वापरले जाते. त्यावर बारकाईने लक्ष देतो. आता ग्राहक थोडा निवांत झाला आहे. त्याच्या मनातली सुरुवातीला कोरोनाविषयी असलेली भीती आता कमी झालेली आहे. म्हणजे आता ग्राहक फोन करून विचारतात तुम्ही करणार का फेशियल वगैरे तर आम्ही तयार आहोत, पण नियमाप्रमाणेच आम्ही चालत असल्यामुळे आम्ही तीही रिस्क घेत नाही आहोत.
अशी काळजी घेतो…
सलूनमध्ये ग्राहक आल्यावर बाहेरच सॅनिटायझर स्प्रे मारतो, त्याच्या शरीराचे तापमान मोजतो. त्यानंतर आत आल्यावर त्याच्या हातावर सॅनिटायझर मारले जाते. प्रत्येक पार्लरवाल्याने सेफ्टी किट केलेले आहेत. माझ्या सलूनमध्ये मी ग्राहकांना पीपीई किट देतो. जर त्या ग्राहकाला गरज असेल तर त्याचे चार्ज देऊन घेतात. ज्यांना नको आहे. अशा वेळी खुर्च्या सॅनिटाईझ केल्या जातात. वापरण्यात आलेल्या सगळ्या वस्तू दर दोन तासांनी डेटॉलच्या पाण्यात धुतल्या जातात. वॉश रूम, फ्लोअरिंग दर दोन तासांनी स्वच्छ केले जातात. माझा स्टाफ ग्लोव्हज्, मास्क घालून असतात एवढय़ा बारकाईने आम्ही काळजी घेतो. आमच्या सलून ब्युटी पार्लर असोसिएशनच्या वतीने आम्हाला सांगायचे की, तुमची काळजी घेणं आमची जबाबदारी आहे आणि त्याप्रमाणे आम्ही घेत आहोत. आमच्यावर अविश्वास दाखवू नका. सरकारला एवढंच सांगणं आहे की, आमच्या सर्व सेवा सुरू कराव्यात. आज लाखोंनी सलून बंद पडले आहेत. एकटय़ा मुंबईसारख्या शहरात दहा लाख हेअरस्टायलिस्ट आणि ब्युटिशियनचे करीअर त्यावर अवलंबून आहे. अशा सगळ्यांचे करीअर त्यावर आहे. प्रॉडक्ट बनवणाऱया लोकांचेही आहे.
चेहरा आणि केसांची अशी काळजी घ्या
- कोरडय़ा त्वचेसाठी अंडय़ाचा बलक चेहऱयावर पंधरा मिनिटे लावून ठेवावा. नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.
- तेलकट त्वचेसाठी चेहऱयाला अंडय़ाचा पांढरा भाग चेहऱयाला लावा. पंधरा मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवा.
- अर्धी काकडी आणि एक चमचा साखर याची पेस्ट करून फ्रीजमध्ये अर्धा तास ठेवावे. नंतर चेहऱयाला ती पेस्ट लावून दहा मिनिटांनी चेहरा साध्या पाण्याने धुवा. ही पेस्ट कोरडय़ा त्वचेसाठी उपयुक्त आहे.
- कोरडय़ा त्वचेसाठी अर्धे केळे, एक चमचा मध आणि एक चमचा ऑलिव्ह ऑईल यांची पेस्ट करून पंधरा मिनिटांनी चेहरा धुवावा.
- बेसन आणि दहीचे सम प्रमाणात मिश्रण करून चेहऱयावर लावावे. हे मिश्रण फेसवॉश करताना स्क्रब करावे. हे मिश्रण तेलकट त्वचेसाठी फायदेशीर आहे.
- आरोग्यदायी सी व्हिटॅमिनयुक्त फळ, गाजर, कढीपत्ता, पालेभाज्या यांचा आहारात समावेश करा.
- केसांना ब्लीच करू नका. त्याने केसांचे नुकसान होण्याची शक्यता असते.
- केस ड्रायरने सुकवण्यापेक्षा ते कपडय़ाने किंवा फॅनखाली सुकवा.
- केसांना अधूनमधून तेलाने मसाज करा. त्याने रक्तप्रवाह सुधारून केसांची वाढ होण्यास मदत होती.
- नियमित केस धुऊ नका. त्याने केस कोरडे होऊ शकतात.
प्रयोग करू नका
- घरच्या घरी केसांची काळजी घेत असाल तर कुठलाही रंग लावताना त्यांच्या ब्युटिशियनशी सल्ला घेऊन लावावा.
- केसांवर कॅरेटिन, रिबॉण्डिंग केले असेल तर रंग लावायचा म्हणून मेहंदी लावू नका.
- घरच्या घरी कुठलाही हेवी केमिकल ट्रीटमेंट करू नका, ज्याने केस खराब होतील.
- केस चांगल्या पद्धतीने कापता येत असतील तर घरच्या घरी कापा.
कोरोना सेंटर्स
- स्टार मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल प्रा. लि., गोपाळ चौक, चक्की नाका, कल्याण (पूर्व) श्री. स्वप्नील पोतदार 9970149063.
- श्री स्वामी समर्थ मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, गोपाळ भवन, डोंबिवली स्टेशनजवळ, डोंबिवली (पूर्व) श्री. गोविंद रानडे 8828988971.
- आयुष हॉस्पिटल, खडकपाडा, राधानगर, कल्याण (प.) 02512231160.
- नाहर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, कल्याण-शीळ रोड, व्यंकटेश पेट्रोल पंपाजवळ, डोंबिवली पूर्व, डॉ. कुणाल गायकर 8691888890.
































































