बीड निवडणूक घोटाळा : अजून सात कोटींचा गैरव्यवहार उघड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
election

बीड जिल्ह्यामध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत केवळ प्रशिक्षणासाठी देण्यात आलेल्या मंडपामध्येच घोटाळा झालेला नाही तर झेरॉक्स, वेबकास्टींग, व्हिडीओ,फोटो, हमाल, वाहतूक यंत्रणेवर तब्बल सात कोटी रूपये उधळण्यात आले आहेत. तसेच जेवण, वाहन, दूरसंचार, पेट्रोल, डिझेलच्या खर्चाची बिले सादरच करण्यात आलेली नाहीत.

बीड लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये झालेला घोटाळा राज्यभर गाजत आहे. निवडणुक आयोगाने हा घोटाळा गांभीर्याने घेतला आहे. बीड जिल्ह्यामध्ये दुसऱ्यांदा आलेल्या तपास समितीने पारदर्शक चौकशी सुरू केली असताना अजून सात कोटी रूपयाचा अनागोंदी खर्च उघड झाला आहे. ईव्हीएम मशिनच्या वाहतुकीसाठी 48 लाख रूपये खर्च करण्यात आल्याचे दाखवण्यात आले आहे. व्हिडीओ शुटींग आणि फोटोग्राफीचे बिल एक कोटी 78 लाख 46 हजार एवढे झाले आहे. फ्लेक्स, होर्डींग, डीटीपी, कलर प्रिंट, झेरॉक्स छपाई यावर 82 लाख खर्च करण्यात आले आहेत. मतमोजणी दरम्यान लावण्यात आलेल्या हमाल पुरवण्याचे कामाचे बिल 52 लाख रूपयाच्या घरात आहे. त्यापेक्षा मोठा कहर म्हणजे रंगीत दूरसंचार संच, सीडी, डीव्हीडी प्लेअर, प्रोजेक्टर, स्क्रिन, संगणक, लॅपटॉप, प्रिंटर,फॅक्स, ट्रान्सपोर्ट अ‍ॅन्ड ट्रॅव्हल्स, वाहन पुरवणे, जेवण, चहा पाणी, नाष्टा यांनी आपली बिले अद्याप मागितली नाहीत आणि बिले जिल्हाधिकारी कार्यालयात सादरही केली नाहीत. ज्या अर्थी बिले सादर केली नाहीत, त्या अर्थी वातावरण शांत झाल्यानंतर अव्वाच्या सव्वा बिले आकारून लुटमार करण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे.

उच्च न्यायालयापर्यंत लढा देणार-अजित देशमुख
निवडणूक प्रक्रियामध्ये झालेला खर्च पाहता प्रचंड अनागोंदी झाल्याचे स्पष्ट होत आहे. मोठा कालावधी उलटूनसुद्धा अनेक कामाची बिले अद्याप सादर झाली नाहीत. चौकशी समिती झालेल्या खर्चाची चौकशी करत आहे. या समितीने जी बिले सादर झाली नाहीत, त्या प्रकरणाचीही चौकशी करावी, अधिकाऱ्यांनी मोठी मनमानी केली आहे. चौकशी समितीवर आम्ही शंका व्यक्त करत नाहीत. मात्र परिपूर्ण अहवाल सादर न झाल्यास आणि दोषीला पाठीशी घालण्याचे काम झाल्यास आपला लढा उच्च न्यायालयापर्यंत कायम राहिल असे अ‍ॅड.अजित देशमुख यांनी म्हटले आहे.