बीड जिल्ह्यात शाळांची घंटा वाजली, 20 महिन्यानंतर किलबिलाट घुमला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

तब्बल 20 महिन्यानंतर बीड जिल्ह्यातील प्राथमिक शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. बीड जिल्ह्यातील 3 हजार 685 जिल्हा परिषदेच्या आणि खाजगी शाळेतील घंटा आज वाजली. पहिल्याच दिवशी शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद होता. शाळेचा परिसर किलबिलाटाने पुन्हा एकदा घुमला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियम आणि अटींची पूर्तता करण्यासाठी शिक्षण विभागाने विशेष काळजी घेतली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा आणि खाजगी शाळांना सक्त ताकीदही देण्यात आली आहे.

कोरोनामुळे बंद करण्यात आलेल्या प्राथमिक शाळा 20 महिन्यानंतर आज बुधवारी उघडण्यात आल्या. मंगळवारी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी आदेश दिल्यानंतर जिल्हा परिषदेच्या आणि खाजगी शाळेच्या समितीची लगबग सुरू झाली. बुधवारी बीड जिल्ह्यातील 3 हजार 685 शाळांची घंटी वाजली. शहरी भागातील पहिली ते सातवी आणि ग्रामीण भागातील पहिली ते चौथीपर्यंतची शाळा सुरू झाली. जे विद्यार्थी इयत्ता पहिलीमध्ये होते ते आता थेट तिसरीमध्ये पोहचले आहेत. 20 महिन्याच्या कालावधीनंतर शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांचा उत्साह शिगेला पोहचला होता. आपल्या बालमित्रांच्या भेटीमुळे आनंद ओसंडून वाहत होता. नको असलेली रटाळ शाळा त्यांना आता हवीहवीशी वाटली आहे. ऑनलाईनवर अभ्यास करून कंटाळलेले हे विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी आतुर झाले होते. ग्रामीण भागातील शाळा तशा ओस असायच्या, आज मात्र पहिल्यादिवशी शाळेचे वर्ग खचाखच भरले आहेत. शिक्षणाधिकाऱ्यांसह नियुक्त केलेले शिक्षण विभागातील अधिकारी प्रत्येक शाळांवर करडी नजर ठेवून आहेत. कोरोनाच्या संकटात नियम आणि अटीची पुर्तता करण्यासाठी शिक्षण विभागाने सक्त ताकीद दिली आहे. सॅनिटायझर, मास्कचा वापर बंधनकारक केला आहे. दोन विद्यार्थ्यांमधील अंतरही नेमून दिले आहे.

शिक्षक पुन्हा शाळांवर

कोरोनाच्या संकटामध्ये शाळा बंद पडल्या आणि प्रत्येक शाळेतील शिक्षकांना कोरोना दूत म्हणून इतर ठिकाणी सेवेमध्ये घेण्यात आले होते. हे शिक्षक आता लसीकरणाच्या कामालाही लावले होते. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी उशिरा आदेश पारित करून कोरोनाच्या कामामध्ये असणाNया शिक्षकांना परत शाळेवर जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत.