
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
‘पीने वालो को पीने का बहाना चाहिए’ असं सर्रास म्हटलं जातं. यामुळे आनंदाचा क्षण असो की दुखाःचा, पिणारे नेहमीच तयार असतात. याच मूडमध्ये मग आपण एखाद्या बार किंवा रेस्टोरंटमध्ये जातो. मस्तपैकी चिल्ड बीअरचे एक दोन ग्लास रिचवतो. पण यापुढे असं करताना जरा थांबा. कारण सर्दी खोकल्याचं औषध घेतानाही तुम्ही त्यावरची एक्सपायरी डेट बघता ना, मग बीअरच्या टीन वा बाटलीवरची का नाही. कारण तुमचं हेच दुर्लक्ष तुमची किडनी खराब करू शकतं, हे वेळीच ओळखा.
तज्ज्ञांच्या मते बऱ्याच बार व रेस्टोरंटमध्ये एक्सपायरी डेट उलटून गेलेली बीअर किंवा इतर मद्यप्रकार सर्रासपणे विकली जातात. त्यातच अशा ठिकाणी येताना लोकांचा मूडही वेगळा असतो. यामुळे ते कधीही एक्सपायरी डेट बघण्याचा विचारही करत नाहीत. पण अशी बीअर किंवा इतर मद्य प्यायल्याने त्याचा किडनीवर दुष्परिणाम होतो. किडनी फेल होण्याची शक्यता वाढते. यामुळे बार किंवा रेस्टोरंटमध्ये पिण्याआधी बीअर किंवा इतर मद्याच्या बाटल्यांवरील एक्सपायरी डेट तपासून घेणे गरजेचे आहे.
























































