कानडी पोलिसांच्या बंदोबस्तातच बेळगाव शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्या गाडीवर कन्नडीगांनी हल्ला करुन पुन्हा एकदा मराठी भाषिकांना डिवचण्याचा प्रकार केला आहे. भर रस्त्यावर पोलिसांच्या उपस्थितीत एकटे असताना गाडीवरील शिवसेनेचा फलक आणि भगवा ध्वजाची मोडतोड करण्याचा प्रयत्न केला. तरी सुद्धा शिरोळकर यांनी एकट्याने या सर्वांचा प्रतिकार केला. यापूर्वीही बेळगावचे उपमहापौर असताना शिरोळकर यांच्यावर हल्ला करुन काळे फासण्याचा प्रयत्न झाला होता.
दरम्यान, शिवसेना पदाधिकाऱ्यांवर हा जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याने सीमाभागात वातावरण पुन्हा एकदा तंग झाले आहे. बेळगाव युवासमितीचे शुभम शेळके यांच्यासह शिवसैनिकांनी तातडीने धाव घेत धर्मवीर संभाजी चौक येथे रास्ता रोको केला. यावेळी बेळगावचे पोलीस उपायुक्त विक्रम आमटे यांनी संबंधित कन्नडीगांवर कारवाई करण्याची ग्वाही दिली.
बेळगाव महानगरपालिकेसमोरच गेल्या महिनाभरापूर्वी मुठभर कन्नडीगांनी कानडी पोलिसांच्या समोरच तिरंगा ध्वजाचा अवमान करणारा अनाधिकृत लाल-पिवळा ध्वज फडकविला आहे. हा बेकायदेशीर लाल-पिवळा ध्वज हटविण्यासाठी निवेदन देऊन, विनंत्या केल्यानंतर दोन दिवसांपूर्वीच मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शिवसेनेच्या वतीने धडक मोर्चा काढण्यात आला होता. त्यामुळे मराठी भाषिकांच्या द्वेषाने कन्नडीग अधिकच पिसाळले होते.
आज दुपारी बेळगाव येथील रामलिंगखिंड गल्ली येथील शिवसेना कार्यालयातून शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर हे शहरप्रमुख प्रवीण तेजम यांच्यासह बाहेर पडले असता, शंभर मीटर अंतरावरच दबा धरून बसलेल्या कन्नडीगांनी गाडी अडवून शिरोळकर यांना धमकावण्याचा प्रयत्न केला. यावेळी शिरोळकर यांनी गाडीतून उतरुन या सर्वांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला.
विशेष म्हणजे कानडी पोलिसांच्या उपस्थितीत अधिकच चेव चढलेल्या कन्नडीगांनी थेट अंगावर धाऊन जात, गाडीवरील शिवसेनेचा फलक आणि भगवा ध्वजाची मोडतोड करण्याचा प्रयत्न केला. यावेळी कानडी पोलिसांनी कन्नडीगांना रोखण्याऐवजी शिरोळकर यांनाच अटकाव केल्याने वातावरण अधिकच तंग झाले होते.
जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्या गाडीवर हल्ला झाल्याचे समजताच सीमाभागात संतापाची लाट उसळली. युवासमितीचे शुभम शेळके यांच्यासह शिवसैनिकांनी धाव घेत धर्मवीर संभाजी महाराज चौकात रास्तारोको आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात बोलविले. पण संतप्त शिवसैनिकांनी पोलीस अधिकाऱ्यांनाच आंदोलनस्थळी येण्यास भाग पाडले. पोलीस उपायुक्त विक्रम आमटे आमटे यांनीही पोलिसांच्या उपस्थितीत हा हल्ला झाल्याची माहिती देत संबंधितांवर कारवाई करण्याची ग्वाही दिली.

































































