
तीन वर्षांपूर्वी कर्नाटक सरकारकडून बरखास्त केलेल्या आणि तब्बल आठ वर्षांनी होत असलेल्या बेळगाव महानगरपालिकेवर कुणाची सत्ता येणार याचा निकाल उद्या लागणार आहे. महापालिकेसाठी शुक्रवारी 50.41 टक्के मतदान झाले होते. आतापर्यंत मराठी भाषिकांनी सत्ता राखण्यात यश मिळवले होते. यंदा प्रथमच भाजप, काँग्रेससह आप या राष्ट्रीय पक्षांनी उमेदवार उभे केले होते. मतदानाचा घसरलेला टक्का, मतदार यादीतील घोळ याचा फटका कोणाला बसणार हे या निकालातून स्पष्ट होणार आहे.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमालढय़ात मराठी भाषिक चळवळीचे प्रमुख पेंद्र असलेल्या बेळगाव महापालिकेच्या निवडणुकीत 58 प्रभागांतून तब्बल 385 उमेदवार आपले भवितव्य अजमावत आहेत. 1 लाख 13 हजार 396 पुरुष, 1 लाख 3 हजार 764 महिला असे एकूण 2 लाख 17 हजार 160 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. कानडी प्रशासनाची दडपशाही झुगारून गल्लोगल्ली घरांवर भगवे ध्वज फडकवून मराठी भाषिकांनी मतदान करुन लक्ष वेधले होते. या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या झेंडय़ाखाली मराठी भाषिक पुन्हा एकदा एकवटले असून, समितीकडून 23 मराठी भाषिक उमेदवार अधिकृत घोषित केले आहेत. तर, अन्य प्रभागांत मराठी भाषिक उमेदवारांना निवडणूक लढवण्याची मुभा समितीकडून देण्यात आली आहे.
बहुमत कोण मिळवणार; पैजा लागल्या
यापूर्वी 2013 साली निवडणूक झाली होती. महाराष्ट्र एकीकरण समितीने सत्तेची 27ची मॅजिक फिगर गाठली होती. मराठी भाषिक नगरसेवकांची संख्या तीसच्या पुढे ठेवण्यात मराठी भाषिकांना यश आले होते. त्यामुळेच बेळगाव महापालिकेत मराठी महापौर होता. आता या निवडणुकीत पुन्हा मराठी भाषिकांच्या हाती सत्ता येणार यांसह कोण निवडून येणार यावरुन सर्वत्र पैजाही लागल्या आहेत.






























































