
बंगळुरूमधील परप्पना अगरहारा तुरुंगातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या तुरुंगात कैद असलेला इसिसशी संबंधित एक संशयित दहशतवादी चक्क स्मार्टफोन वापरत असून तो तुरुंगातून त्याच्या सहकाऱ्यांशी संपर्क साधत आहे. तुरुंगातील काही व्हिडीओ समोर आल्यानंतर हे प्रकार उघडकीस आले. या घटनेवरून पुन्हा एकदा या तुरुंगातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न चिन्ह उभे राहिले आहेत.
जुहाद हमीद शकरील मन्ना असे त्या इसिसशी संबंधित व्यक्तीचे नाव आहे. त्याच्यासोबत सिरियल रेपिस्ट व मर्डरर उमेश रेड्डी हा देखील मोबाईल वापरताना व टिव्ही पाहताना समोर आलेल्या व्हिडीओत दिसत आहे. या व्हिडीओत जुहाद हा चक्क आरामात चहा पित असताना मोबाईल सर्फिंग करताना दिसत आहे.
हे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सध्या तुरुंग प्रशासनावर मोठ्या प्रमाणात टीका होत असून सरकारने या प्रकरणी उच्च स्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. या चौकशीच्या अहवालानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.
याआधी ऑक्टोबर महिन्यातही अशा प्रकारचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. त्यात एक कुख्यात गुंड श्रीनिवास उर्फ गुब्बाची सिना हा तुरुंगात त्याचा वाढदिवस साजरा करताना दिसत होता. त्याला सफरचंदाची माळ घालण्यात आली होती व तो केक कापताना या व्हिडीओत दिसत आहे.




























































