‘बेस्ट’च्या ताफ्यात येणार 225 एसी बस, लंडनची डबल डेकर मुंबईत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एकेकाळी ‘बेस्ट’चे वैभव असणाऱया डबल डेकर बस पुन्हा एकदा मुंबईकरांच्या सेवेत अत्याधुनिक आणि अद्ययावत स्वरूपात डेरेदाखल होणार आहेत. यासाठी ‘बेस्ट’ प्रशासनाची कार्यवाही अंतिम टप्प्यात आली असून जानेवारीअखेरपर्यंत 225 बस येणार असून फेब्रुवारीपासून प्रत्यक्ष रस्त्यावर धावतील, अशी माहिती ‘बेस्ट’ प्रशासनाकडून देण्यात आली.

पर्यावरण संवर्धनासाठी ‘बेस्ट’मध्ये 2027 पर्यंत 100 टक्के बस इलेक्ट्रिक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ‘बेस्ट’ प्रशासनाकडून यासाठी कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. ‘बेस्ट’मध्ये सद्यस्थितीत सुमारे 3377 बसेस आहेत. यातील 1524 बसेस भाडेतत्त्वावर चालवल्या जातात. आता प्रवाशांच्या सेवेसाठी ‘बेस्ट’ने गाडय़ा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. एकूण 54 आसन क्षमता असलेल्या एकूण 900 डबल डेकर बसेस दाखल होणार असून पहिल्या टप्प्यात 225 बसेस जानेवारी अखेरपर्यंत दाखल होणार आहेत. सद्यस्थितीत ‘बेस्ट’ उपक्रमाच्या ताफ्यात 45 डबल डेकर बस आहेत, मात्र या बसेसची वयोमर्यादा संपुष्टात येत असल्याने नवीन वातानुकूलित डबल डेकर बस घेण्यात येणार आहेत.

अशा असणार नव्या बस

नोव्हेंबरमध्येच या बस दाखल होणार होत्या, मात्र काही बदल करण्यात येत असून केंद्रीय परिवहन विभागाच्या परवानग्या मिळणे बाकी अस्ल्याने फेब्रुवारीपर्यंत बस रस्त्यावर धावतील.

यामध्ये जानेवारीअखेरपर्यंत 225, मार्च 2023 पर्यंत 225 आणि जून 2023 पर्यंत उर्वरित 450 बस बेस्ट ताफ्यात येतील, अशी माहिती ‘बेस्ट’ प्रशासनाकडून देण्यात आली.

लंडनमधील डबल डेकर बसच्या धर्तीवर या बस असतील. डबल डेकर एसी इलेक्ट्रिक बसमध्ये दोन्ही बाजूने प्रवेशद्वार असल्याने प्रवाशांसाठी मोठी सुविधा मिळणार आहे. शिवाय सुरक्षेच्या दृष्टीने बसमध्ये सीसीटीव्हीची सुविधा देण्यात आली आहे.