
बेस्टच्या ताफ्यात खासगी कंपन्यांच्या बसेसचे वाढलेले प्रमाण सध्या बेस्ट कर्मचाऱयांसाठी डोकेदुखीचा विषय बनले आहे. खासगी कंपन्या बेस्ट उपक्रमाकडून भाडय़ाच्या रूपात मोठा फायदा कमावत आहेत. त्या कंपन्यांच्या फायद्यासाठी बेस्टच्या चालक-वाहकांना अतिरिक्त कामाचा ताण सहन करावा लागत आहे. त्यांची डय़ुटी आठ तासांपेक्षा अधिक होत असून अतिरिक्त कामाचा भत्ताही वेळेत मिळत नसल्याने बेस्ट कर्मचाऱयांमध्ये प्रचंड नाराजी आहे.
बेस्टच्या ताफ्यात सद्यस्थितीत ‘ऑलेक्ट्रा’सारख्या पंपन्यांच्या बसेसचे प्रमाण अधिक आहे. त्या कंपन्यांच्या कंत्राटी चालक-वाहकांची अरेरावी, उद्धट वर्तणुकीचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे. त्याचप्रमाणे खासगी कंपन्यांच्या बसेस बेस्टच्या चालक-वाहकांसाठी त्रासदायी ठरत आहेत. बेस्टच्या मध्य मुंबई आगारात खासगी कंपन्यांचे 233 बसचालक आहेत. खासगी बसेसच्या तुलनेत कंत्राटी चालकांची संख्या 50 चे 60 ने कमी आहे. त्यामुळे दररोज खासगी बसेसच्या शेडय़ुलमध्ये बेस्टच्या चालक-वाहकांची डय़ुटी लावली जात आहे. खासगी बसेसचे दररोजचे 190 ते 200 किमीचे टार्गेट पूर्ण करून घेतले जात आहे.
‘ऑलेक्ट्रा’च्या भाडय़ापोटी नाहक भुर्दंड
‘ऑलेक्ट्रा’ कंपनीची एक बस दरदिवशी 190 किमी चालवणे बंधनकारक आहे. प्रत्यक्षात ही बस फक्त 110 ते 120 किमी धावते. त्यामुळे प्रवासी सेवेत न धावताही ‘ऑलेक्ट्रा’ कंपनीला नाहक उर्वरित 70 ते 80 किमीचे भाडे देणे बेस्ट उपक्रमाला भाग पडत आहे. खासगी कंपनीचे बसचालक नसल्यामुळे बेस्टच्या चालकांना 1200 रुपये देऊन ती बस चालवावी लागते. यात बेस्ट उपक्रमाचे प्रचंड नुकसान होत असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.
चालक-वाहकांची डय़ुटीसाठी धावाधाव
खासगी कंपन्यांच्या बस चालवण्यासाठी बेस्टच्या चालक-वाहकांची गरज भासते. अशावेळी चालक-वाहकांना डय़ुटीसाठी अचानक दुसऱया आगारात पाठवले जाते. त्यामुळे चालक-वाहकांना दुसऱया आगारात वेळेत पोहोचण्यासाठी धावाधाव करावी लागते. यात मोठा मनस्ताप होत असल्याची नाराजी वांद्रे आगारातील बेस्टच्या एका चालकाने व्यक्त केली.



























































