भंडारदरा परिसरात बुधवारपर्यंत एकेरी वाहतूक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्वातंत्र्यदिन आणि सलग सुट्टय़ांमुळे पर्यटनस्थळ असलेल्या भंडारदरा धरण परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. तसेच पावसामुळे रस्ते खराब झाले असून, रस्ते अरुंद असल्यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून दि. 13 ते 16 हे चार दिवस एकेरी वाहतूक करण्यात येणार असल्याची माहिती राजूरचे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण दातरे यांनी दिली.

मुळा प्रवरा पाणलोट क्षेत्रात पावसाळ्यात कोसळणारा पाऊस आणि त्यानंतर श्रावणसरीचा शिडकावा, घनदाट झाडी आणि घाट वळणाचे रस्ते, मनमुराद आनंद देणारा विस्तृत जलाशय, पावसाळ्यात वारंवार धुक्यात हरवणारा घाटघर, साम्रद परिसर, हिरवाईने नटलेली सह्याद्रीची डोंगररांग अशा वेगवेगळ्या कारणांनी हा परिसर पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत असतो.

हरिश्चंद्रगड व कळसुबाई शिखर यांच्या पायथ्याशी असलेल्या मुळा व भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने विश्रांती घेतली असून, सध्या तुरळक केवळ श्रावणसरी बरसत आहेत. मुळा प्रवरा पाणलोटात ऊन-पावसाचा खेळ सुरू झाल्याने पर्यटकांची संख्याही लक्षणीय वाढली आहे. त्यात स्वतंत्र्यदिन दरम्यान चार दिवस सलग सुट्टीमुळे पर्यटकांची होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन राजूर पोलिसांनी जय्यत तयारी केली आहे.

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर भंडारदरा येथे पुणे, नाशिक, ठाणे, मुंबई व नगर जिह्यातून बहुसंख्येने पर्यटक येतात. या पार्श्वभूमीवर राजूर पोलीस सतर्क झाले आहेत. रविवारी (दि. 13) सकाळी 8 वाजता राजूरपासून भंडारदऱयाकडे जाण्यासाठी रंधा फाटा येथून प्रवेश बंद करण्यात आला आहे. तर भंडारदऱयाला जाण्यासाठी वाकी फाटा, वारंघुशी फाटा येथून प्रवेश करता येईल.

वाहतूकमार्गात झालेला बदल

n वारंघुशी फाटा, वाकी फाटा, चिंचोडी फाटा, यश रिसॉर्ट, शेंडी, भंडारदरा धरण, स्पिलवे गेट, भंडारदरा गाव, गुहिरे, रंधा मार्ग इच्छितस्थळी जातील. ऍम्ब्युलन्स, अग्निशमन दल, शासकीय वाहने यांना एकेरी वाहतुकीचे नियम राहणार नाहीत. भंडारदरा धरण परिसरात पाटबंधारे विभागाचे सुरक्षारक्षक नेमण्यात आल्याची माहिती शाखा अधिकारी अभिजित देशमुख यांनी दिली.