भंडारदरा तुडुंब, नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

उत्तर नगर जिह्याला वरदान ठरलेला 11 हजार 39 दशलक्ष घनफूट क्षमतेचा भंडारदरा प्रकल्प आज तुडुंब झाला. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासांत झालेल्या धुवाँधार पावसामुळे आज सकाळी धरणाने 10 हजार 500 दशलक्ष घनफुटाची (95 टक्के) तांत्रिक पातळी गाठली.

सध्या भंडारदरा धरणातून 2 हजार 44 क्युसेकने पाणी सोडले जात असून, निळवंडय़ातून 6 हजार 654 क्युसेक वेगाने प्रवरा नदीपात्रात विसर्ग सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. पारंपरिक पद्धतीने 15 ऑगस्टपूर्वीच भंडारदरा धरण तांत्रिकदृष्टय़ा भरल्याने आनंद व्यक्त केला जात आहे. दरम्यान, भंडारदरा धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग वाढविला जाण्याची दाट शक्यता असल्याने नदीकाठावरील नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी आश्रयास थांबावे व आपल्या पाळीव जनावरांनाही सुरक्षित ठिकाणी हलवावे, असे आवाहन भंडारदरा धरणाचे शाखा अभियंता अभिजित देशमुख यांनी केले आहे.