भारत शिक्षण मंडळाच्या वरिष्ठ महाविद्यालयाचे उद्घाटन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी 

महाविद्यालयांमधून विद्यार्थ्यांना तेच-तेच अभ्यासक्रम शिकविले जात आहेत. विद्यार्थ्यांना आयुष्यभर पुरेल अशी शिदोरी दिली पाहिजे. यासाठी शिक्षण पध्दतीत बदल होणे आवश्यक आहे. नव्या पिढीला नवा विचार द्या. आज शाळा, महाविद्यालयांच्या संख्या वाढत आहेत परंतु गुणवत्ता हरवत गेली आहे. मात्र पटवर्धन हायस्कुलमध्ये पाय ठेवल्यानंतर येथे त्यागाचा गंध आला. ही संस्था दीपस्तंभाप्रमाणे आहे असे प्रितपादन राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानाचे संचालक डॉ.विजय जोशी यांनी केले. भारत शिक्षण मंडळाच्या वरिष्ठ महाविद्यालयाचे उद्घाटन आणि तीन शाखांचा नामकरण समारंभ प्रसंगी ते बोलत होते.  भारत शिक्षण मंडळाच्या कला, वाणिज्य, विज्ञान वरिष्ठ महाविदयालयाचा औपचारिक उद्घाटन वनवासी कल्याण मंडळांचे अखिल भारतीय संघटनमंत्री अतुल जोग यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी अ.भा.संघटन मंत्री, वनवासी कल्याण आश्रम अतुल जोग, एअर मार्शल हेमंत भागवत, म्हाडा अध्यक्ष आमदार उदय सामंत, नगराध्यक्ष राहुल पंडित, देणगीदार रमेश कीर, नमिता कीर आदि उपस्थित होते.

ज्यांनी शिक्षणाला महत्व दिले त्याच देशांची आज प्रगती झाली आहे. विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती हे शिक्षकांचे आद्य कर्तव्य आहे. आजही तळमळीने  शिकविणारे शिक्षक महाराष्ट्रात असल्यामुळेच महाराष्ट्र शिक्षणात पुढे असल्याचे मत हेमंत भागवत यांनी व्यक्त केले.

रत्नागिरीकरांमध्ये दातृत्वाचा गुण आहे. या संस्थेसाठी रंगमंच उभारण्यासाठी मी सहकार्य करेन तसेच खासदार विनायक राऊत यांनी खासदार निधीतून दहा लाख रुपये महाविद्यालयासाठी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले असल्याचे आमदार उदय सामंत यांनी सांगितले. काही शिक्षण संस्थेचे पदाधिकारी स्वतःच्या प्रगतीसाठी संस्थांचा  उपयोग करतात. परंतु या संस्थेत अशी परिस्थिती नाही. असे सुभाष देव यांनी सांगितले.

कोकणातील विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून दिली की ते त्याचे सोन करतात. शिक्षण क्षेत्र, सहकारात कधीहि राजकारण करायचे नाही. या संस्था पुर्वीपासून समर्पित भावनेने काम करते आहे. शिक्षण संस्थेसाठी निधी उभा करणे सोपे नाही परंतु ही संस्था निरलसपणे काम करत आहे त्यामुळे या संस्थेच्या मदतीसाठी अनेक हात पुढे येत असल्याचे रमेश कीर यांनी सांगितले नामकरण सोहळाचा प्रारंभ दीपप्रज्वलन व प्रतिमापूजनाने करण्यात आला.

महाविदयालयाच्या मैदानाच्या अत्याधुकीकरणासाठी अॅड उल्हास लांजेकर यांनी सव्वालाख रुपये देणगी देण्याचे या कार्यक्रमात जाहीर केले यानंतर रमेश कीर यांनी कोकणाचे शिक्षण केंद्र रत्नागिरी आहे, कोकणातील विदयार्थ्यांना संधी उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे तसेच माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या आठवणी सांगितल्या.

यावेळी नमिता कीर, पद्मजा घैसास, रमेश देव, वृषाली देव, सुखदा देव, भार्गवराम घैसास, भारत शिक्षण मंडळाचे कार्यवाह सुनिल वणजू आणि भारत शिक्षण मंडळाचे सर्व पदाधिकारी, महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या निलोफर बन्नीकोप तसेच बालवाडी पासून ते कनिष्ठ महाविदयालयातील प्राध्यापक तसेच वरिष्ठ महाविदयालयातील सर्व प्राध्यापकवृंद व महाविदयालयाचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.