
भारतीय कामगार सेनेच्या प्रयत्नांमुळे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर देखरेखीचे काम करणाऱ्या इनोव्हसोर्स कंपनीतील 120 उच्चशिक्षित तरुणांना न्याय मिळाला आहे. इनोव्हसोर्स कंपनीचे कॉण्ट्रक्ट संपुष्टात आल्याने या कामगारांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला होता. याची दखल घेत शिवसेनेने आंदोलनाचा इशारा दिला होता. भारतीय कामगार सेनेमुळे या कामगारांना आता बी.व्ही.जी. कंपनीत सामावून घेण्यात येणार असून त्यांना इतर सुविधादेखील मिळणार आहेत.
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मर्यादित अंतर्गत ‘इनोव्हसोर्स’ कंपनीचे कॉण्ट्रक्ट संपुष्टात आल्याने या कंपनीत काम करणाऱ्या 120 उच्चशिक्षित कर्मचाऱ्यांना बी.व्ही.जी. कंपनीच्या पेरोलवर समाविष्ट करून घेताना अनेक जाचक अटी घातल्या. त्यामुळे या कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला होता. ही बाब भारतीय कामगार सेनेचे कार्यकारिणी सदस्य शिवा सितापुरे व विशाल इंगवले व चिटणीस राजा ठाणगे यांनी संयुक्त सरचिटणीस संजय कदम यांच्या निदर्शनास आणली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे तसेच भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष, शिवसेना नेते- खासदार अरविंद सावंत यांच्या मार्गदर्शनानुसार संयुक्त सरचिटणीस संजय कदम व चिटणीस राजा ठाणगे यांनी मियाल प्रशासनाचे सीएओ विष्णू झा आणि बी.व्ही.जी. कंपनीचे सीनियर व्ही.पी. विपिन टिकू आणि योगीशा राव यांच्याशी संपर्क साधून प्रश्न मार्गी लावला.
पीएफ, सुट्टय़ा आणि वैद्यकीय सुविधादेखील मिळणार
शिवसेनेने दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यामुळे अखेर मियाल आणि बी.व्ही.जी. प्रशासन नरमले. शुक्रवारी तातडीने बैठक घेऊन कर्मचाऱ्यांना अपेक्षित असलेले सर्व प्रश्न मार्गी लावले. कर्मचाऱ्यांना 5 ऑगस्ट 2025 रोजी ठरवून दिलेला पगार व सुविधांसह बी.व्ही.जी. कंपनीमध्ये समाविष्ट करून घ्यावे, कोणत्याही कर्मचाऱ्याला नोकरीवरून कमी करू नये, सर्व कर्मचाऱ्यांना नोकरीचे हमीपत्र द्यावे, सर्व सीएसई, पीएसई आणि डीटीओ कर्मचाऱ्यांना पीएफ आणि वैद्यकीय सुविधा द्याव्या तसेच सर्व कर्मचाऱ्यांना सीएल, पीएल आणि एसएल रजा द्याव्यात असे प्रश्न या बैठकीत मार्गी लावण्यात आले. यावेळी सर्व कमिटी सदस्य आणि मोठय़ा संख्येने कर्मचारी उपस्थित होते.