
मुंबई विमानतळावर ग्राऊंड हॅण्डलिंगचे काम करणाऱ्या तुर्कीच्या ‘सेलेबी’ कंपनीचा सुरक्षा परवाना रद्द करण्यात आला आहे. अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे येथील 3700 कामगारांच्या रोजीरोटीवर गंडांतर आले. मात्र भारतीय कामगार सेनेच्या प्रयत्नामुळे या कामगारांच्या रोजीरोटीचा प्रश्न सुटला असून सेलेबीच्या जागी येणाऱ्या इंडो-थाई कंपनीमध्ये सर्व कामगारांना त्याच पगारावर सामावून घेण्यात आले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून त्यांनी भारतीय कामगार सेनेचे आभार मानले आहेत.
पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ ही मोहीम राबवत पाकिस्तानमधील 9 अतिरेकी अड्डय़ांवर सर्जिकल स्ट्राईक करून ती ठिकाणे उद्ध्वस्त केली. यानंतर भारत आणि पाकिस्तानात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली. त्यावेळी तुर्कस्तानने पाकिस्तानला उघडपणे साथ देत शस्त्रास्त्रे आणि ड्रोन पुरवले. याच्या निषेधार्थ भारत सरकारने देशात तुर्की कंपन्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. याचा परिणाम छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर ग्राऊंड हॅण्डलिंगचे काम करणाऱया तुर्कीच्या ‘सेलेबी’ कंपनीचा सुरक्षा परवाना रद्द करण्यात आला. या कंपनीत सुमारे 3700 कामगार कार्यरत होते, जे सर्व भारतीय कामगार सेनेचे सभासद आहेत. गेली 16 वर्षे भारतीय कामगार सेना हीच मान्यताप्राप्त संघटना आहे. अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे या कामगारांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला होता.
ही गंभीर बाब लक्षात घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना नेते-खासदार आणि भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष अरविंद सावंत आणि संयुक्त सरचिटणीस संजय कदम यांनी तातडीने हस्तक्षेप केला. त्यांनी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट कंपनीशी चर्चा करून कामगार कपात न करता सर्व कामगारांना सेलेबीच्या जागी येणाऱ्या इंडो-थाई कंपनीमध्ये त्याच पगारावर कायम ठेवण्याची मागणी केली होती.
भारतीय कामगार सेना सदैव कामगारांच्या पाठीशी
भारतीय कामगार सेनेच्या प्रयत्नांना यश आले असून इंडो-थाई कंपनीने सर्व कामगारांना पुन्हा कामावर घेतले. यानंतर कामगारांना संबोधित करताना भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष, शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत म्हणाले, ‘भारतीय कामगार सेना सदैव कामगारांच्या मागे उभी असून संपूर्ण न्याय मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही.’ या लढय़ात संयुक्त सरचिटणीस संजय कदम यांच्यासोबत नीलेश ठाणगे, सुजित कारेकर, नरेंद्र दळवी, सुदर्शन वारसे, संतोष लखमदे, हेमंत नाईक आदी समिती सदस्यांनी अथक मेहनत घेतली.