…म्हणूनच त्यांच्या मनात अटकेची भीती; भास्कर जाधव यांचा फडणवीसांवर पलटवार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाविकास आघाडी सरकारने भाजप कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केले. आपल्याला कारागृहात टाकण्यासाठी जंगजंग पछाडले होते. पण, ते काही करु शकले नाहीत. ज्यांना ही जबाबदारी दिली, तेच कारागृहात गेले, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीला लगावला होता. याला आता शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.

देवेद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्याबाबत विचारले असता भास्कर जाधव म्हणाले, त्यांच्या विधानाला फार महत्व देण्याची गरज नाही. पण, कुठंतरी काहीतरी घडले असावे म्हणून फडणवीसांच्या मनात अटक होण्याची भिती निर्माण झाली आहे. फडणवीसांनी काही चूक किंवा गुन्हा केला आहे का, असा सवालही त्यांनी केला. फडणवीसांच्या अटकेची कुठेही चर्चा नाही. फडणवीसांनीच मुद्दा उपस्थित केल्याने, काय खरं काय खोटं हे महाराष्ट्राला सांगितलं पाहिजे, असेही जाधव म्हणाले.

आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यात 45 आणि विधानसभेच्या 200 जागा जिंकण्यासाठी भाजपाने महाविजय 2024 अभियान शनिवारी जाहीर केले. यावर भास्कर जाधव यांना विचारले असता, त्यांनी सांगितले, समाजात वेगवेगळे आकडे फेकून संभ्रम निर्माण करायचे हे भाजपाचे नियोजन आहे. आमच्या पक्षाशिवाय कोणीची नाही, असे वातावरण निर्माण करतात. ही भाजपाची जुनी सवय आणि खोड आहे. एवढीच हिंमत असेल तर मुंबई, ठाणे महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक घेऊन दाखवाव्यात. त्यांचा पराभव ठरलेला आहे, असेही भास्कर जाधव म्हणाले.