बार्शीतील बलात्काराच्या निषेधार्थ देवेंद्र फडणवीसांच्या पुतळ्याचे दहन; ‘भीम आर्मी’चे सोलापुरात आंदोलन

 बार्शी तालुक्यातील बळेवाडी येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणाचा निषेध करीत ‘भीम आर्मी’च्या वतीने सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. आरोपींना फाशीच्या शिक्षेची मागणी करीत फडणवीसांचा निषेध करण्यात आला. बार्शी तालुक्यातील बळेवाडी येथे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून हत्या करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जिह्यात तीक्र पडसाद उमटत आहेत. भीम आर्मी संघटनेच्या वतीने या घटनेचा तीक्र निषेध करीत उपमुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे जिल्हाधिकरी कार्यालयासमोर दहन करण्यात आले. यावेळी पोलीस व कार्यकर्त्यांत झटापट झाली.

भीम आर्मीचे शहराध्यक्ष अजय मैंदर्गीकर म्हणाले, उपमुख्यमंत्री फडणवीस हे अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिच्या हत्येचा प्रयत्न झाल्याप्रकरणी चकार शब्द बोलत नाहीत. पीडित मुलीला 50 लाखांची मदत मिळावी व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष मिलिंद प्रक्षाळे, महिला आघाडीच्या विशाखा उबाळे, अनिता गायकवाड, ‘प्रहार’ संघटनेच्या जिल्हाध्यक्षा संजीवनी बारंगुळे, तालुकाध्यक्ष सोनाली गायकवाड, आरती कांबळे, लक्ष्मी माने, ज्योत्स्ना गोरटे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.