भिवंडी – इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा 39 वर

भिवंडीच्या ‘जिलानी’ इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा 39 वर पोहोचला आहे. दुर्घटनास्थळी अद्याप बचाव कार्य सुरू असून आणखी काही जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्यां 25 जणांवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

भिवंडीतील तीन मजली जिलानी इमारत ही सोमवारी पहाटे पावणेचारच्या सुमारास कोसळली. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची मदत राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणार असल्याचे ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. इमारत कोसळल्याचे वृत्त समजताच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली. एनडीआरएफची एक तुकडी, ठाणे महापालिकेच्या आपत्कालीन विभागाची तुकडी, ठाणे आपत्ती प्रतिसाद दल आणि भिवंडी अग्निशमन दलाचे जवान पहाटेपासून मदतकार्यात गुंतले असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. जखमींना महापालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून शिंदे यांनी तिथेही भेट देऊन जखमींची विचारपूस केली, तसेच उपचारांबाबत डॉक्टरांकडून माहिती घेतली.

या दुर्घटनेची चौकशी करण्यात येईल, असे शिंदे यांनी जाहीर केले. भिवंडी महापालिकेने शहरातील 102 धोकादायक इमारती रिकाम्या केल्या असून अशा प्रकारच्या इमारतींचा आढावा सातत्याने प्रशासनाकडून घेतला जातो, असेही शिंदे यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या