बनारस हिंदू विद्यापीठात हिंदू धर्माबाबतचा अभ्यासक्रम; असा अभ्यासक्रम राबवणारे पहिलेच विद्यापीठ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
BHU

बनारस हिंदू विद्यापीठाने (BHU)हिंदू धर्माबाबतचा अभ्यासक्रम सुरू केला आहे. आशा प्रकारचा अभ्यासक्रम सुरू करणारे ते देशातील पहिले विद्यापीठ ठरले आहे. विद्यापीठाने हिंदू धर्माबाबतचा पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू केला आहे, असे विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. देशात अशा प्रकारचा अभ्यासक्रम सुरू करणारे हे पहिलेच विद्यापीठ असल्याचे सांगण्यात आले.

कला विद्याशाखेतंर्गत हा अभ्यासक्रम तत्त्वज्ञान आणि धर्म, संस्कृत आणि प्राचीन इतिहास, संस्कृती आणि पुरातत्व विभागांच्या सहकार्याने विद्यापीठाच्या शताब्दी वर्षात स्थापन करण्यात आलेल्या भारत अध्यायन केंद्रामध्ये आयोजित होणार आहे. भारत अध्‍ययन केंद्राचे संयोजक प्रा. सदाशिव कुमार द्विवेदी यांनी सांगितले की, या दोन वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी पहिल्या बॅचमध्ये परदेशी व्यक्तीसह 45 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. हा अभ्यासक्रम चार सत्रांचा असून त्याचे 16 पेपर असणार आहेत. 1914 मध्ये विद्यापीठाची स्थापना झाल्यानंतर हिंदू धर्मावरील अभ्यासक्रम सुरू होण्यास शतकाहून अधिक काळ लागला, असे प्रा. द्विवेदी यांनी सांगितले.

या अभ्यासक्रमाचे उद्घाटन मंगळवारी रेक्टर प्रा.व्ही.के.शुक्ला यांच्या हस्ते झाले. ते म्हणाले की विद्यापीठाने असा अभ्यासक्रम सुरू करणे ही अभिमानाची बाब आहे. या अभअयासक्रमामुळे जगाला हिंदू धर्माच्या अनेक अज्ञात पैलूंची माहिती मिळेल. तसेच धर्माबाबतची माहिती, शिकवण आणि ज्ञान जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यास मदत होणार आहे.

हिंदू धर्माच्या अभ्यासक्रमाची सध्याची काळात गरज आहे. विद्यापीठाने हा चांगला निर्णय घेतल्याचे इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर आर्ट्सचे संचालक विजय शंकर शुक्ला यांनी सांगितले. अशा प्रकारच्या अभ्यासक्रमाची संकल्पना 18 व्या शतकातील विचारवंत पंडित गणेशनाथ झा आणि मदन मोहन मालवीय यांची होती. मात्र, मधल्या कालखंडात काही कारणाने यात खंड पडला.आता विद्यापीठाने ती परंपरा पुढे नेण्यासाठी चांगला प्रयत्न केला आहे, असे ते म्हणाले.

हिंदू धर्मातील मंत्रांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यांना वैज्ञानिक आधार आहे. त्याबाबतची माहितीही या अभ्यासक्रमात देण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमाद्वारे देशाच्या सनातन परंपरेचेही ज्ञान देण्यात येणार आहे. सनातळ परंपरेतीली मूल्य, जीवनशैली, जीवनाचे तत्त्वज्ञान आणि गायत्री मंत्राचे महत्त्व या अभ्यासक्रमाद्वारे जगासमोर येणार आहे, असे यावेळी सांगण्यात आले.