
शाळेत इतिहासाच्या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराजांविषयी वाचले होते, पण या सिनेमाच्या दृष्टीने तयारी करताना मला हे चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व नव्याने कळले…सांगतोय अभिनेता भूषण पाटील.
आपल्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वावर कळत-नकळतपणे एक ना अनेक व्यक्तींची छाप पडलेली असते. मग ते आपले गुरू असो किंवा आई-वडील. ज्यांच्या व्यक्तिमत्त्वातून आपल्याला एक अनामिक प्रेरणा मिळते. अधिक चांगला माणूस बनण्यासाठी प्रोत्साहन मिळते. ज्यांची काराकीर्द, ज्यांचा इतिहासवाचूनसुद्धा अंगावरती रोमांच उभे राहतात व आपल्याला अगदी यांच्यासारखे नाही, पण यांच्या जवळपास तरी जाता येईल का? असा विचार मनात डोकावतो. त्यांच्या प्रत्येक कृतीतून काही ना काहीतरी दान आपल्या ओंजळीत पडत असते. अशाच व्यक्तिमत्त्वांपैकी एक म्हणजे छत्रपती संभाजी महाराज! ‘शिवरायांचा छावा’ या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारण्याचे सौभाग्य मला मिळाले.
आजवर अनेकदा मी माझ्या मनात विचार करायचो की, शेतकरी कुटुंबात जन्मलेला मी या कलाक्षेत्रात कसा काय बरे आलो असेन? नेमके काय कारण असेल की, या क्षेत्राने मला खुणावले? माझ्या स्वप्नांना असे रंगीत पंख दिले. आजवर ते कारण माझे मला सापडले नव्हते, पण या सिनेमातील मध्यवर्ती भूमिकेसाठी जेव्हा माझी निवड झाली तेव्हा आजवर न सुटलेले हे कोडे चुटकीसरशी सुटले.
शाळेत इतिहासाच्या पुस्तकात संभाजी राजांविषयी वाचले होते, पण या सिनेमाच्या दृष्टीने तयारी करताना मला हे चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व नव्याने कळले. माझ्याही नकळत माझ्या मनात ते झिरपत गेले…उमगत, उमलत गेले. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपुलकीने असंख्य माणसे जोडली…मावळे जोडले जे महाराजांच्या एक हाकेवरती तळहातावरती प्राण घेऊन लढायला सज्ज होते. प्राणाची आहुती द्यायला तयार होते. कारण त्यांना खात्री होती की, जर आपले काही बरे-वाईट झाले तर आपला हा लोककल्याणकारी राजा आईच्या मायाने माझ्या कुटुंबाला पंखाखाली घेईल. हा जो विश्वास मावळय़ांच्या मनात रुजवला गेला होता छत्रपती शंभूराजांनी त्यांच्या कर्तृत्वाने, विश्वासाने तो जोपासला व अधिकाधिक गडद केला.
इतिहासात नमूद केले आहे की, संभाजी महाराज राजबिंडे आणि शूर होते. अनेक भाषांत विद्याविशारद होते. राजकारणातील छुपे डावपेच त्यांनी मोठय़ा मेहनतीने शिकून घेतले होते. ही भूमिका साकारताना मला मग नव्याने आपली माणसे जोडण्याचे एक-एक कसब समजत गेले. टीमवर्क महत्त्वाचे असते. त्यामुळे अशक्य गोष्टीसुद्धा शक्य करू शकतो. संभाजी महाराजांनी आयुष्यात कधी हार मानली नाही, आलेल्या संकटाशी ते तडफेने, जिद्दीने, शिताफीने चार हात करत राहिले. त्यांचे स्वधर्मावर, स्वराज्यावर, रयतेवर असलेले प्रेम हे अनमोल होते. असे एक ना अनेक त्यांचे गुण आहेत. प्रत्येक व्यक्तीने आपापल्या क्षेत्रात स्वराज्य बनवण्यासाठी त्याग केला पाहिजे, जिद्द ठेवली पाहिजे आणि संयम बाळगला पाहिजे.
शब्दांकन – निनाद पाटील
























































