श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या ‘चिमणी बचाव’साठी शेतकरी एकवटले सोलापुरातील होम मैदानावर भव्य मोर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दक्षिण सोलापूर तालुक्यातील प्रस्तावित बोरामणी विमानतळ व्हाके आणि श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी वाचविण्यासाठी कारखान्याचे संचालक तथा मार्गदर्शक धर्मराज काडादी यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी कुमठे येथील सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यापासून सोलापूर शहरातील होम मैदानावर भव्य मोर्चा काढण्यात आला. दरम्यान, सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी पाडण्याच्या बाजूने असलेल्या आमदार विजयकुमार देशमुख यांचा मोर्चात तीव्र निषेध करण्यात आला.

हजारोंच्या संख्येने शेतकरी या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत. या मोर्चामध्ये उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट तालुक्यातील सर्वपक्षीय नेते मोठय़ा संख्येने सहभागी झाले आहेत. माजी आमदार आडम मास्तर यांनीही या मोर्चाला पाठिंबा दिला असून, त्यांच्या कार्यकर्त्यांचा मोठा जथा सभास्थळी दाखल झाल्याचे पाहायला मिळत आहे. मोर्चाच्या ठिकाणी कारखान्याच्या चिमणीची प्रतिकृती ठेवण्यात आली होती.

कारखान्याचे चेअरमन धर्मराज काडादी म्हणाले, ‘‘सोलापूरच्या विमानसेवेमध्ये केवळ सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी हा एकच अडथळा असल्याचे सांगितले जाते. मात्र, त्याला तर 35 अडथळे आहेत; परंतु त्याकडे कोणीही लक्ष देत नाही. बोरामणी येथे पर्यायी आंतरराष्ट्रीय दर्जाचे किमानतळ होत असताना, जाणीवपूर्वक कारखान्याला त्रास दिला जात आहे.’’