धनंजय मुंडे यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा, गुन्हे दाखल करण्याच्या निर्णयाला स्थगिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । परळी वैजनाथ

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. दोन दिवसापूर्वी संभाजीनगर येथील उच्च न्यायालयाने दिलेल्या गुन्हे दाखल करण्याच्या आदेशाला स्थगिती दिली आहे. त्याचबरोबर धनंजय मुंडे यांच्यावर शुक्रवारी पहाटे दाखल केलेल्या बर्दापूर पोलीस ठाण्यातील गुन्ह्यालाही स्थगिती मिळाली आहे.

अंबाजोगाई तालुक्यातील पुस येथे नियोजित जगमित्र शुगर मिलसाठी बेकायदेशीररित्या जमीन हस्तांतर प्रकरणी धनंजय मुंडे यांच्या विरोधात उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. सदर जमीन ही देवस्थानची असल्याचा दावा करण्यात आला होता.

या प्रकरणाची सुनावणी करताना संभाजीनगर उच्च न्यायालयाने गुन्हे दाखल करण्याचा आदेश दिला होता. या आदेशाविरुद्ध धनंजय मुंडे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्या ठिकाणी या प्रकरणावर आज सुनावणी होणार असताना पोलिसांनी आज पहाटेच बर्दापूर पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रियाही पूर्ण केली.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे धनंजय मुंडे यांनी स्वागत केले असून सत्याचा विजय झाला अशी प्रतिक्रिया दिली.