
सामना प्रतिनिधी । नांदेड
नांदेड शहरात पोलीसांना निवासस्थान देण्यासाठी शहरातील स्नेहनगर पोलीस वसाहत, पोलीस मुख्यालयाजवळील पोलीस वसाहत आणि वजिराबाद पोलीस ठाण्याच्या प्रागंणात पोलीस वसाहत अशी तीन ठिकाणी वस्ती आहे. या वस्तीतील कुण्या पोलिसाने स्वत:चे घर नवीन बनविले, भूखंड किंवा फ्लॅट घेतला तर ते आपल्या घरात राहायला जातात. पण आपल्या घरात राहायला गेले अनेक पोलीस शासकीय घरात राहत आहेत असे दाखवून ते घर दुसऱ्या पोलीसांना भाड्याने देतात आणि चांगलेच भाडे वसुल करतात. त्यामुळे ज्यांना अधिकाराने या शासकीय सवलतीचा उपभोग घेता यावा त्या पेक्षा पैसे देऊन शासकीय घराचा वापर वाढला आहे.
पोलीस दलात नियुक्ती झाल्यावर उपलब्ध असेल तर त्यांना शासकीय घर मिळते. शासकीय घर मिळण्यासाठी काही विहित अटी आहेत. त्या अटीनुसार त्या पात्रतेचे घर पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचारी यांना त्यांच्या पदानुरूप दिले जाते. त्यामुळे शहरातील पोलीसांना याचा भरपूर आधार आहे. अनेक जागी पोलीसांना खाजगी घर भाड्याने द्यावे लागते. त्यांच्या पगारीच्या अनुरूप त्यांना खाजगी घरात राहण्याचे भाडे मिळते त्यापेक्षा जास्त भाडे त्यांना द्यावे लागते. काही लोकांना शासकीय भाडे मिळते त्यापेक्षा कमी भाड्यामध्ये खाजगी घर भाड्याने मिळते. या दोन्ही परिस्थितीमध्ये पहिली बाब ज्यांना जास्त भाडे द्यावे लागते. ते याबद्दल ओरड करतात पण ज्यांना कमी भाडे लागते ते कधीच सांगत नाहीत. काही जण शासकीय पोलीस वस्तीमध्ये राहतात. शासकीय पोलीस वस्तीत राहणे हे त्यांच्यासाठी एक सुरक्षा सोय आहे.
शासकीय पोलीस वस्तीत राहणारे अनेक पोलीस कर्मचारी आपले स्वत:चे घर तयार करतात. पण शासकीय वस्तीत असलेले घर रिकामे करीत नाहीत. अभिलेखावर मी आजही शासकीय घरातच राहतो असे दाखविले जाते. पण त्यांचे रिकामे झालेले घर ज्या पोलीस कर्मचाऱ्यांना घर भेटले नाही ते कर्मचारी खासगी दराप्रमाणे घर भाड्याने घेतात. कारण यावस्तीत राहणे म्हणजे आपल्यासाठी सुरक्षा आहे, असा अर्थ असतो. पोलीस वस्तीमध्ये लाईन इन्चार्ज असतो. त्याची ही जबाबदारी आहे की, शासकीय घरांमध्ये कोण राहतो आहे आणि कोण दुसऱ्या घरात गेला आहे, त्याच्या घरात कोण राहतो हे सर्व त्याला दिसायला हवे कारण त्याचे कामच अत्यंत मर्यादीत आहे आणि या शासकीय वस्तीशिवाय त्याच्याकडे दुसरीक काही पोलीस विभागाची जबाबदारी नसते पण तो या बाबतची माहिती पोलीस अधिक्षक कार्यालयाला किंवा आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देत नाही आणि हा बेकायदा शासकीय घर किरायाने देण्याचा प्रकार पोलीस विभागात सुरूच राहतो. आजही अनेक अशी घरे दुसऱ्या पोलीसांना भाडेतत्त्वाने देऊन त्या घराचे मुळ ताबेदार आपल्या स्वत:च्या घरात राहायला गेले आहेत आणि भाडे वसुल करीत आहेत असाच प्रकार सुरू आहे.
























































