प्राणीप्रेमाचा आदर्श…लाडक्या कुत्र्याची वाजतगाजत अंत्ययात्रा; विधीवत केले अंत्यसंस्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
dog
प्रातिनिधिक फोटो

बिहारमध्ये प्राणीप्रेमाची आदर्श ठरणारी अनोखी घटना घडली आहे. आपल्या लाडक्या पाळीव कुत्र्याचे निधन झाल्यानंतर त्याला निरोप देण्यासाठी मालकाने त्याची वाजतगाजत अंत्ययात्रा काढली. तसेच त्याच्यावर विधीवत अंत्यसंस्कारही केले. सध्या ही अंत्ययात्रा आणि प्राणीप्रेम चर्चेचा विषय ठरली आहे.

बिहारच्या समस्तपुरातील शेरपूर दियारा येथील ही घटना आहे, नरेश साहू असे मालकाचे नाव असून ते व्यवसायाने डॉक्टर आहेत. नरेश यांनी 12 वर्षांपूर्वी सोनपुरच्या जत्रेतून एक कुत्रा खरेदी केला होता. त्याचे नाव त्यांनी टोनी ठेवले होते. लहान असल्यापासून त्याला सगळ्यांनीच अगदी लाडाने वाढवले होते. घरातला तो महत्वाचा सदस्य बनला होता, त्याचबरोबर आजुबाजुंच्या लोकांनाही त्याचा लळा लागला होता.

टोनी आमच्यासाठी कुत्रा कधीच नव्हता. तो घरातील एक सदस्य होता. ज्याच्यावर सगळ्यांचे अतोनात प्रेम होते. तो जेव्हापासून त्यांच्या घरात आला तेव्हापासून आमची प्रगती होत गेली, तो आमच्यासाठी लकी असल्याचे नरेश यांनी सांगितले.

टोनीचा मंगळवारी मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूने सगळेच भावूक झाले. घरातील सदस्याप्रमाणे तो असल्याने त्याच्यावर हिंदू परंपरेनुसार अंत्यसंस्कार  करण्यात आले. त्याला सफेद कापडात गुंडाळून त्याच्यावर हार फुले घातली. त्याच्या अंत्यदर्शनासाठी अनेकांनी गर्दी केली होती. त्यानंतर त्याची वाजतगाजत अंत्ययात्रा काढून गंगा नदीच्या किनाऱ्याजवळ त्याचे दफन करण्यात आले.ही घटना सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे.