6 वर्षीय मुलीवर बलात्कार करण्याला फाशीची शिक्षा, फक्त 15 दिवसात झाला न्यायनिवाडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिहरमधील अररिया येथे एका सहा वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. मोहम्मद मेजर असे या आरोपीचे नाव आहे. विशेष न्यायाधीश शशिकांत राय यांनी एडीजे-6 सह पॉक्सो कायद्यांतर्गत 48 वर्षीय मेजरला दोषी ठरवले असून त्याला शिक्षेसह दंडही ठोठावला आहे. न्यायालयाने एससी/एसटी कायद्याच्या कलमांतर्गत त्याला 10,000 रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच न्यायालयाने पॉक्सो कायद्यांतर्गत मुलीच्या कुटुंबाला व्हिक्टिम फंडातून दहा लाख रुपये देण्याचे आदेश डीएलएसए सचिवाला दिले आहेत.

दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर अवघ्या तीन सुनावणी आणि 15 दिवसांत शिक्षा सुनावून न्यायालयाने एक नवीन आदर्श निर्माण केला आहे. 1 डिसेंबर रोजी घडलेल्या या घटनेनंतर तपास अधिकारी रिता कुमारी यांनी 12 जानेवारी रोजी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. न्यायालयाने 20 जानेवारी रोजी या प्रकरणाची दखल घेतली. 22 जानेवारी रोजी आरोप निश्चित करण्यात आले. 25 जानेवारीला आरोपीला दोषी ठरवून 27 जानेवारीला शिक्षा सुनावण्यात आली.

आरोपी मेजर हा बिहारमधील अररिया येथील भरगामा पोलीस स्टेशन हद्दीतील वीरनगर पश्चिम येथील रहिवासी आहे. या प्रकरणाची माहिती देताना विशेष पीपी पॉक्सो डॉ. श्याम लाल यादव यांनी सांगितले की, 1 डिसेंबर 2021 रोजी रात्री आठ वाजता मेजरने सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याची ही घटना घडली होती. न्यायालयात हजर झालेल्या साक्षीदारांचे म्हणणे ऐकून आणि पुरावे तपासल्यानंतर न्यायाधीश शशिकांत राय यांनी आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली आहे.