वडूजमध्ये दुचाकी कुलूपबंद; चोरीच्या घटनांमुळे वाहनचालक हैराण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वडूज शहरात गेल्या दोन ते तीन महिन्यांत दुचाकी चोरीच्या घटना सातत्याने घडत आहेत. विशेषतः भर रस्त्यावरील दुचाकी चोरीस जात असल्याने वाहनचालक हैराण झाले आहेत. त्यामुळे काही नागरिकांनी दुचाकी लॉक करण्याबरोबरच त्याला लोखंडी साखळी बांधून टाळेच ठोकले आहे. चोरीच्या वाढत्या घटनांमुळे दुचाकीही कुलूपबंद झाल्या आहेत.

शहरात गेल्या दोन ते तीन महिन्यांत दुचाकीचोरीच्या घटना सातत्याने घडत आहेत. शहरातील बसस्थानक, तहसीलदार कार्यालय परिसर, बँका या ठिकाणी कामकाजानिमित्त नागरिकांची वर्दळ दिसून येते. बहुतांशी लोकांकडून दुचाकीचा वापर होत असल्याने येथे आलेल्या नागरिकांच्या दुचाकीचोरीस जाण्याच्या घटना घडत आहेत. गजबजलेल्या ठिकाणी दुचाकी वाहनांची दुचाकी वाहनांची चोरी होत असल्याने खळबळ उडाली आहे.

हँडल लॉक करून ठेवलेल्या दुचाकी चोरटे सराईतपणे लॉक तोडून दुचाकी गायब करीत आहेत. त्यामुळे वाहनचालकांनी दुचाकी वाहनांनाच अधिकची लोखंडी साखळी व कुलुपे लावली आहेत. दुचाकीचोरीची शहरातील नागरिकांनी चांगलीच धास्ती घेतल्याचे दिसून येत आहे.

शहरात सीसीटीव्हींची गरज
वडूज हे खटाव तालुक्यातील मध्यवर्ती शहर आहे. या शहरातील काही मोजक्याच खासगी व्यावसायिकांनी रस्त्याच्या पुढील दर्शनी भागात सीसीटीव्ही लावले आहेत. त्यामुळे एखादी मोठी घटना घडल्यास पोलिसांना खासगी व्यावसायिकांच्या सीसीटीव्ही फुटेजचा आधार घ्यावा लागतो. मात्र, त्याच्या कव्हरेज क्षेत्रात चोरटे सापडतीलच असे सांगता येत नाही. त्यामुळे शहरातील रहदारीचे प्रमुख रस्ते आणि चौकांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याची गरज आहे.