बिल गेट्सची निवृत्ती

>> अमित घोडेकर, वरिष्ठ अध्यक्ष मोतीलाल ओसवाल लिमिटेड

गेल्या काही वर्षांपूर्वी बिल गेट्सने मायक्रोसॉफ्टच्या दैनंदिन कामकाजातून लक्ष काढून घेतले आणि सत्या नाडेला ह्या हिंदुस्थानी व्यक्तीच्या हातात मायक्रोसॉफ्टची मदार दिली. आता बिल गेट्सने त्याचा नवीन प्रवास सुरु केला आहे.

गेल्या चार दशकांत मायक्रोसॉफ्ट आणि विंडोज या दोन गोष्टी म्हणजे जगातील सगळ्यात जास्त वापरल्या जाणाऱया गोष्टी आहेत. अनेक गोष्टी अशा असतात, ज्या आपल्या आयुष्याचा नकळत एक भाग बनून जातात आणि आपल्याला हे कळतदेखील नाही. असंच काहीसं मायक्रोसॉफ्टच्या विंडोजचं आहे त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे मायक्रोसॉफ्टची विंडोज संगणक प्रणाली आणि मायक्रोसॉफ्ट ऑफिस किंवा अगदी वर्ड, एक्सेल, पावरपॉइंट हे सॉफ्टवेअर. हे सगळे जण आपल्या घरातील एक अविभाज्य घटक असल्याप्रमाणे सदैव आपल्या सोबत असतात. त्यामुळे विंडोज सोडून आपण दुसरा कुठला विचारदेखील करू शकत नाही. हाच विचार बिल गेट्सने चार दशकांपूर्वी केला होता.

बिल गेट्स आणि विंडोजची सुरुवातदेखील अतिशय खडतर प्रवासातून झाली. बिल गेट्सला कायम स्वतःची संगणक प्रणाली बनवायची होती, पण त्या काळी जगावर आयबीएम् या जगप्रसिद्ध संगणक कंपनीचे गारुड होते आणि जगात सगळीकडे फक्त आयबीएमचे संगणक मोठय़ा प्रमाणात वापरले जात होते. हे संगणक अतिशय चांगले होते आणि यात अनेक चांगली वैशिष्टय़ेदेखील होती, पण एक गोष्ट त्यात चांगली नव्हती ती म्हणजे संगणक प्रणाली. बिल गेट्स हा एक अतिशय धडपडय़ा व्यक्ती होता आणि त्याने ही गोष्ट वेळीच हेरली होती. बिल गेट्सचं शिक्षण पण यथातथाच झालं होतं, पण संगणक क्षेत्रात काहीतरी मोठं करायचं ही ऊर्मी त्यात होती. मग तो बरेच दिवस आयबीएमसाठी संगणक प्रणाली बदलण्याच्या मागे लागला. नंतर अतिशय किरकोळ किमतीमध्ये त्याने आयबीएमसाठी अए ही संगणक प्रणाली बनवून दिली. ही प्रणाली म्हणजे आजच्या सगळ्या संगणक प्रणालीची सुरुवात होती. या संगणक प्रणालीने जगाला नवीन विचार करायला लावला. काही दिवसांतच या संगणक प्रणालीने एक मैलाचा दगड जगासमोर ठेवला. ही संगणक प्रणाली खूप लोकप्रिय झाली आणि जगात मायक्रोसॉफ्ट आणि बिल गेट्सचे नाव सर्वदूर पोहोचले.

या यशाने बिलकूल हुरळून न जाता बिल गेट्स काहीतरी नवीनच करायचा विचार करत होता आणि नंतर एके दिवशी अचानक झेरॉक्स कंपनीचे झेरॉक्स मशीन बघत असताना त्याला माऊस दिसला. हाच तो जगप्रसिद्ध माऊस घेऊन काहीतरी नवीन करायचं हे त्याने ठरवलं आणि चक्क झेरॉक्सकडून त्याने माऊसचे कायदेशीर हक्क विकत घेतले. पुढचे काही महिने मायक्रोसॉफ्ट आणि बिल गेट्स त्यांच्या नवीन संगणक प्रणालीवर अहोरात्र काम करत होते आणि काही दिवसांतच बिल गेट्सने जगाला मायक्रोसॉफ्ट विंडोज नावाची नवीन संगणक प्रणाली दिली. विंडोज ही संगणक प्रणाली गेल्या चार दशकांपासून जगावर अधिराज्य करत आहे.

काही वर्षांतच बिल गेट्स हा जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती म्हणून नावारूपाला आला आणि कित्येक वर्षे तो जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून कायम राहिला. प्रचंड संपत्ती कमावल्यावरदेखील बिल गेट्सचे पाय कायम जमिनीवरच राहिले. त्यामुळेच तो कोणत्याही वादात किंवा कोणत्याही वाईट गोष्टीत कधीही अडकला नाही. पुढे कालांतराने त्याने त्याची बिल आणि मिलिंडा गेट्स नावाची संस्था काढली. ही संस्था जगातील नामवंत संस्था म्हणून खूप कमी वेळात नावारूपाला आली ती तिच्या समाजसेवेच्या कार्यातून. बिल आणि मिलिंडा गेट्स फाऊंडेशनने जगात अनेक मोठे आणि चांगले उपक्रम राबवले. मग ते एड्स प्रतिबंधक असोत की मुलांचे शिक्षण असो. त्यांनी समाजासाठी काम करणाऱयांसाठी खास बिल अँड मिलिंडा गेट्स फाऊंडेशन पुरस्कारदेखील सुरू केला. हे सगळं करत असताना मायक्रोसॉफ्टने बिल आणि मिलिंडा गेट्स फाऊंडेशनला सढळ हाताने आर्थिक मदतदेखील केली.

गेल्या काही वर्षांपूर्वी बिल गेट्सने मायक्रोसॉफ्टच्या दैनंदिन कामकाजातून लक्ष काढून घेतले आणि सत्या नाडेला या हिंदुस्थानी व्यक्तीच्या हातात मायक्रोसॉफ्टची मदार दिली. काही वर्षांत सत्या नाडेलाने मायक्रोसॉफ्टला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे आणि आता बिल गेट्सने त्याचा नवीन प्रवास सुरू केला आहे. बिल गेट्सने मायक्रोसॉफ्ट मधील सगळ्या पदांचा राजीनाना देऊन टाकला आहे. बिल गेट्सने आपल्या आयुष्याचा पुढील भाग फक्त समाजसेवेसाठी वेचायचा निर्धार केला आहे. त्यासाठी त्याने इथून पुढे फक्त बिल आणि मिलिंडा गेट्सद्वारे समाजसेवा करणार असल्याचे जाहीर केले आहे. सगळी संपत्ती ज्याच्या पायापाशी लोटांगण घालत होती, त्या बिल गेट्सने जगातील अनेक श्रीमंत लोकांना समाजसेवा कशी करायची याचा उत्तम वस्तुपाठ घालून दिला आहे.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या