अब्जाधीशाचा मुलगा बनला भिख्खू, 40 हजार कोटींच्या संपत्तीवर सोडले पाणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सर्व काही पैसा आहे असे अनेकांना वाटते, परंतु पैशांच्या पलीकडेसुद्धा सुख आहे. फक्त त्याचा शोध घेता आला पाहिजे, याचा प्रत्यय देणारी घटना नुकतीच उघडकीस आली आहे. तब्बल 40 हजार कोटींहून अधिक मालमत्ता असलेल्या उद्योगपतींच्या मुलाने दीक्षा घेत भिख्खू होण्याचा मार्ग निवडला आहे. अजहन सिरीपान्यो असे या मुलाचे नाव असून तो मलेशियातील अब्जाधीश आनंदा कृष्णन यांचा मुलगा आहे. आनंदा कृष्णन हे नाव मलेशियात दूरसंचार क्षेत्रातील मोठे नाव आहे. आनंदा कृष्णन यांना वेन अजहन सिरीपान्यो हा एकुलता एक मुलगा आहे. तो आता बौद्ध भिख्खू बनला आहे. त्यामुळे त्याने त्यांच्या सर्व संपत्तींचा त्याग केलाय. आनंदा कृष्णन यांना ‘एके’ नावानेही ओळखले जाते. ‘एके’ हे मलेशियातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांच्याकडे कोटय़वधींची संपत्ती आहे. दूरसंचार, मीडिया, रिअल इस्टेटसारख्या वेगवेगळय़ा क्षेत्रात त्यांचा उद्योग पसरला आहे. ‘एअरसेल’ हीदेखील त्यांचीच कंपनी आहे. वयाच्या 18 व्या वर्षी, वेन अजहन सिरीपान्यो हे आपल्या आईच्या कुटुंबाला भेटण्यासाठी थायलंडला गेले होते. यादरम्यान त्यांना जो अनुभव आला त्यामुळे त्यांनी कायमस्वरूपी भिख्खू म्हणून जीवन जगण्याचा निर्णय घेतला.

अजहन आता संन्यासी

अजहन आता एक वन संन्यासी म्हणून जीवन जगत आहे. ते ‘दाताओ डॅम’ विहाराचे प्रमुख आहेत. थायलंडच्या राजघराण्यातील ते वंशजदेखील आहेत. सिरीपान्योच्या यांना आठ भाषा येतात. इंग्रजी, तमीळ आणि थाई भाषादेखील बोलता येते. बौद्ध भिख्खू झाल्यानंतरही ते आपल्या वडिलांना भेटण्यासाठी वेळ काढतात. कारण बौद्ध धर्मातील सिद्धांत कौटुंबिक प्रेमावरही भर देतो.