रानू मंडलवर येणार बायोपिक, ही अभिनेत्री दिसणार मुख्य भूमिकेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोशल मीडियाच्या जमान्यात कोण कसं प्रसिद्ध होईल, याचा काही नेम नसतो. एखादा सामान्य माणूस सोशल मीडियाच्या माध्यमातून रातोरात स्टार बनू शकतो. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे रानू मंडल.

रानू लतादीदींचं ‘एक प्यार का नगमा है’ हे गाणं गात असतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आणि ती स्टार झाली. त्यानंतर रानू मंडलला हिमेश रेशमिया याने आपल्या चित्रपटातील गाण्याची ऑफरही दिली. आता, रानू मंडलवर बायोपिक बनणार असल्याचं वृत्त आहे.

या चित्रपटाचं दिग्दर्शन ऋषिकेश मंडल करणार आहेत. या चित्रपटाचं नाव मिस रानू मारिया असं असेल. या चित्रपटाचं चित्रीकरण लवकरच कोलकाता आणि मुंबईत सुरू होईल. प्रसंग वास्तववादी वाटावेत यासाठी रानू प्रत्यक्षात ज्या शहरांत राहिली, तिथेच हे चित्रीकरण होईल, असं निर्मात्यांचं म्हणणं आहे.

या बायोपिकमध्ये रानूच्या मध्यवर्ती भूमिकेत इशिका डे असणार आहे. इशिका यापूर्वी अनेक हिंदी आणि बांग्ला चित्रपटांमध्ये झळकली आहे. यापूर्वी ही भूमिका सुदीप्ता चक्रवर्ती नावाच्या अभिनेत्रीला मिळाली होती. मात्र, तिच्या तारखा मिळत नसल्याने इशिकाची निवड करण्यात आली.

इशिकाने रानूच्या भूमिकेसाठी मेहनत सुरू केली आहे. गेल्या दोन महिन्यात तिने दहा किलो वजन घटवलं आहे. रानूने जवळपास बारा वर्षं रेल्वे प्लॅटफॉर्मवर भीक मागून आयुष्य व्यतित केल्याने, तसं दिसण्यासाठी ही मेहनत आहे. इशिका लवकरच रानूला भेटणार असून त्यानंतर या चित्रपटाचं चित्रीकरण नोव्हेंबरमध्ये सुरू होईल. हा चित्रपट पुढील वर्षी मार्च-एप्रिल दरम्यान प्रदर्शित करण्याचा निर्मात्यांचा मानस आहे.