चिमुकल्याच्या वाढदिवसाची भायखळा कारागृहात धूम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आशिष बनसोडे । मुंबई

‘झुक झुक झुक झुक आगीन गाडी…सांग सांग भोलानाथ…ससा रे ससा… नाच रे मोरा…’ आदी बालगीते तसेच ‘झिंग झिंग झिंगाट, सोनू तुझा माझ्यावर भरवसा नाय काय’ अशी उडती गाणी, त्यावर मनसोक्त थिरकणारी चिमुकली पावलं, सर्वांनी स्वच्छ व नवीन कपडे परिधान केलेले. माँजिनीसचा चॉकलेट केक, बिस्किट, वेफर्स. सोबतीला बर्थ डे कॅप, गिफ्ट… अशा जबरदस्त माहोलमध्ये भायखळा कारागृहात तीन वर्षाच्या रिषिकेशचा धुमधडाक्यात वाढदिवस नुकताच साजरा करण्यात आला.

एखादा गुन्हा केल्यानंतर थेट रवानगी तुरुंगात होते. मग तुरुंगाच्या चार भिंतीआड जीवन जगावे लागते. जर कोणा कैदी महिलेला चिमुकला बालक असेल तर त्या मुलालाही कोणताही दोष नसताना केवळ आई आहे म्हणून तिच्या सोबत कोठडीत राहावे लागते. भायखळा कारागृहात ३८६ महिला कैदी आहेत. तर त्यातील माता कैदींसोबत २१ बालकेदेखील कारागृहात आहेत. त्यात १३ मुलगे आणि ८ मुली आहेत. या बालकांनादेखील चार भिंतीआड वयाच्या सहा वर्षांपर्यंत राहावे लागते. या बालकांच्या मनावर विपरीत परिणाम होऊ नये, त्यांनाही इतर बालकांप्रमाणे मौजमजा तसेच त्यांची हौस पूर्ण करता यावी याची भायखळा कारगृहात अधीक्षक व कर्मचाऱयांकडून जाणीवपूर्वक विशेष काळजी घेतली जाते. याची प्रचीती नुकतीच आली. कारागृहात नुकताच ३ वर्षांच्या रिषिकेशचा धुमधडाक्यात वाढदिवस साजरा करण्यात आला. तर त्याआधी ४० दिवसाच्या चिमुकलीचे धुमधडाक्यात बारसे करण्यात आले. तसेच रमजान ईददेखील उत्साहात साजरी करण्यात आली. असे आनंद देणारे, उत्साहाचे वातावरण निर्माण करून बालकांचे मंनोरंजन करणारे कार्यक्रम कारागृहात केले जातात.

कारागृहात सहा वर्षांपर्यंत असलेली लहान निरागस बालके त्यांच्या मातांसोबत राहतात. चार भिंतीच्या आत राहणाऱ्या या बालकांचे योग्य संगोपन व्हावे, इतर मुलांप्रमाणे यांचीही जडणघडण व्हावी, यासाठी आम्ही आवश्यक ते सर्व करतो. वाढदिवस, बारसे, सण सोहळे साजरे करणे हा त्याचाच भाग आहे. या निमित्ताने सर्व कैदी एकत्र येतात. त्यांच्यात चांगली भावना निर्माण होते. निबंध स्पर्धा, नृत्य स्पर्धा, चित्रकला अशाप्रकारे त्यांच्या कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न आम्ही करतो. बालकांसाठी बालवाडी असून त्यांना चित्र रंगवणे, कार्टून दाखवणे, गाणी ऐकवणे असे नियमितपणे केले जाते. काही सेवाभावी संस्थादेखील मदतीचा हात देतात. – अरुणा मुगुटराव, भायखळा कारागृह अधीक्षिका