भाजप आता रेल्वेही विकतील, प्रियंका गांधी-वढेरा यांचा हल्लाबोल

हिंदुस्थानी रेल्वे तोट्याच्या ट्रॅकवर धावत असल्याचा अहवाल कॅगने नुकताच दिला आहे. रेल्वेवर ही वेळ भाजपमुळेच आली आहे. भाजप ‘विकण्यात’ पटाईत आहे. आता ते रेल्वेलाही विकायला सुरुवात करतील, असा हल्लाबोल काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी-वढेरा यांनी मंगळवारी भाजपवर केला.

प्रियंका पुढे म्हणाल्या की, आधी सरकारी उपक्रम तोट्यात आणायचे आणि नंतर तोट्यात आले म्हणून ते उपक्रम विक्रीला काढायचे हा भाजपचा फंडाच आहे. रेल्वे ही सर्वसामान्य लोकांची लाइफलाइन आहे, पण भाजपने ही रेल्वे वाईट स्तरावर आणून ठेवली आहे. आता काही दिवसांत ती विकायला काढायलाही ते मागेपुढे पाहणार नाहीत, असेही प्रियंका यांनी स्पष्ट केले. रेल्वेचा ऑपरेटिंग रेशो 2017-18 या आर्थिक वर्षात 98.44 टक्के झाला आहे. रेल्वेच्या उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसत नसल्याबाबत कॅगने नुकतीच चिंता व्यक्त केली आहे.

संपूर्ण देशाच्या सुरक्षेशी खेळ

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी-वढेरा आणि गांधी कुटुंबीयांची एसपीजी सुरक्षा व्यवस्था राजकीय दबावामुळे काढून घेण्यात आली आहे. अशी खेळी करून भाजप संपूर्ण देशाच्याच सुरक्षेशी खेळ खेळत आहेत, अशी घणाघाती टीका प्रियंका यांचे पती रॉबर्ट वढेरा यांनी मंगळवारी केली. ते पुढे म्हणाले की, ही गोष्ट केवळ प्रियंका, माझी मुले आणि गांधी कुटुंबीयांच्या सुरक्षेबद्दलच नाही. हा देशातील सर्वसामान्यांच्या, खास करून देशातील महिलांच्या सुरक्षिततेशी खेळ आहे.

आपली प्रतिक्रिया द्या