
सामना ऑनलाईन । इटानगर
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून पहिल्या टप्प्यातील मतदान 11 एप्रिलला होणार आहे. लोकसभेसह चार राज्यांमध्ये विधानसभा निवडणूकही पार पडणार आहे. परंतु त्यापूर्वीच भारतीय जनता पक्षाचे दोन उमेदवार विजयी झाले आहेत. अरुणाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला हे यश मिळाले असून आलो ईस्ट आणि यचुली या 2 विधानसभा क्षेत्रातून भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. गृहराज्यमंत्री किरण जिजिजू यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली.
आंध्र प्रदेश, ओडिशा, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम या चार राज्यांमध्ये लोकसभेसह विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. विधानसभेसाठी पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. अरुणाचलमध्ये 60 जागा असून येथे काँग्रेसने 53 जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपची सत्ता असलेल्या या राज्यामध्ये 11 एप्रिलला मतदान होणार असून त्यापूर्वी सर केंटो जिनी आणि ताबा तेडीर या भाजप उमेदवारांनी बिनविरोध निवडणूक जिंकली आहे.
One more victory for BJP!
Shri Taba Tedir becomes the second BJP MLA candidate to get elected unopposed from 16-Yachuli Assembly Constituency in Arunachal Pradesh. Congratulations to @BJP4India karyakartas of Yachuli Mondal and Arunachal Pradesh. https://t.co/GJrBdn4nFl— Chowkidar Kiren Rijiju (@KirenRijiju) March 26, 2019
नक्की काय आहे प्रकार?
11 एप्रिलला मतदान होत असलेल्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती 25 मार्च. परंतु सोमवारी सर केंटो जिनी यांच्याविरोधात एकाही उमेदवारने दंड थोपडले नाही आणि अर्जही भरला नाही. त्यामुळे त्यांना बिनविरोध विजयी घोषित करण्यात आले. तर ताबा तेडीर यांच्याविरोधात एकाही उमेदवाराने अर्ज दाखल न केल्याने त्यांनाही विजयी घोषित करण्यात आले. अरुणाचल पश्चिमचे खासदार आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनी मंगळवारी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन याबाबत माहिती दिली.
निवडणूक अधिकाऱ्यांचा नकार
भाजपने जरी इतक्यात दोन जागा जिंकल्याचा दावा केला असला तरी निवडणूक अधिकाऱ्यांनी मात्र हा दावा फेटाळून लावला आहे. अद्याप अर्ज मागे घेण्याची तारीख शिल्लक असल्याने याबाबत निर्णय होणार नसल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले.



























































