सर्वांना अटक करा; रिकाम्या देशात घ्या निवडणुका! ममतांचा प्रहार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजप सर्व सरकारी यंत्रणांचा वापर करून विरोधी पक्षांची कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहे. पण कितीही दबाव टाकला तरी आम्ही मागे हटणार नाही. भाजपला जशास तसे उत्तर देण्यासाठी आम्हीही रणनीती आखत आहोत. या लढाईत जनता आमच्यासोबत आहे आणि 2024च्या निवडणुकीत जनताच भाजपला धडा शिकवेल.

लोकसभा निवडणुकांपूर्वी विरोधी पक्षाच्या नेत्यांना अटक करण्याचे केंद्रातील भाजप सरकारचे कारस्थान असल्याचा गंभीर आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी आज केला. सर्वांना अटक करा आणि रिकाम्या देशात घ्या निवडणुका, असे खुले आव्हानच ममतांनी भाजपला दिले.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने उद्या, गुरुवारी चौकशीला बोलावले आहे तर, विरोधी पक्षांच्या इतर अनेक नेत्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्याचवेळी विरोधी पक्षाच्या अनेक खासदारांचे फोनही आता हॅक करण्यात येत आहेत, असे नमूद करत ममता बॅनर्जी यांनी पडद्यामागे मोदी सरकारचे मोठे कारस्थान सुरू असल्याचा दावा केला.

मोठा कट शिजतोय

पुढील वर्षी होणाऱया सार्वत्रिक निवडणुकांच्या आधी सर्व विरोधी पक्षांचा आवाज बंद करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. निवडणुकांपूर्वी सर्वांना अटक करण्याचा त्यांचा डाव आहे. म्हणजे देशात विरोधी पक्षच नसेल आणि विरोधकांविना रिकाम्या देशात केवळ भाजपलाच मतदान होईल, असे हे कारस्थान आहे. भाजपला पुढच्या निवडणुका एकटय़ापुरत्या घ्यायच्या आहेत, असा आरोपही ममतांनी केला.