
आपल्या उमेदवाराला विधानसभेत तिकीट मिळाल्याच्या आनंदात नाचणाऱ्या एका भाजप नेत्याचा आकस्मिक मृत्यू झाला आहे. ही घटना मध्य प्रदेशच्या सिहोर येथे घडली आहे. शमा पठाण असं या नेत्याचं नाव असून ते भाजपच्या अल्पसंख्याक विभागाचे स्थानिक अध्यक्ष होते.
सोमवारी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मध्य प्रदेशात विधानसभा निवडणुकांची घोषणा करण्यात आली. त्या दरम्यान, या निवडणुकीसाठी स्थानिक पातळीवर उमेदवारांना तिकीट देण्याचं सत्रही सुरू झालं होतं. त्यातील चौथ्या यादीत सिहोर विधानसभा जागेसाठी आमदार सुदेश राय यांना तिकीट मिळालं. त्यामुळे आनंदात असलेल्या शमा पठाण यांच्यासह कार्यकर्त्यांनी जल्लोष करायला सुरुवात केली. आधी
थोडावेळ फटाके फोडल्यानंतर आतिषबाजी करण्याचे फटाके आणण्यासाठी पठाण पिपलिया मीरा इथे असलेल्या बाजारात निघाले. पण, त्या दरम्यान त्यांना अस्वस्थ वाटू लागलं आणि वाटेत त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे सध्या या ठिकाणी शोकाकूल वातावरण आहे.
























































