भाजप आमदाराच्या सुरक्षारक्षकाचा धिंगाणा, कला केंद्रात रिव्हॉल्वर दाखवून दमदाटी

2
फोटो प्रातिनिधीक

सामना प्रतिनिधी । जामखेड

जामखेड येथील कला केंद्रात बीडमधल्या एका भाजप आमदाराच्या सुरक्षारक्षकाने शुक्रवारी रात्री धिंगाणा घातला. या सुरक्षारक्षकाने रिव्हॉल्वर दाखवून कला केंद्रामध्ये दमदाटी देखील केली. मात्र याबाबत जामखेड पोलिसांनी फक्त चौकशी करून त्याला सोडून दिल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. त्यामुळे भाजपच्या आमदारांचे सुरक्षारक्षक देखील कायदा व सुव्यवस्थेचा मानत नाहीत का असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

जामखेड शहरात गोळीबाराच्या सतत घटना घडत असून यात दोन युवकांनी आपला जीव गमावला आहे. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तालुक्यात अवैध धंदे, खासगी सावकारकी यातूनच गुंडगिरी वाढली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस डायरीत फरार असलेले आरोपी शहरात राजरोसपणे फिरत आहेत. यातील अनेकजन राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहेत. त्यामुळे या गुन्हेगारांवर कुणाचा वरदहस्त आहे याविषयी उलट सुलट चर्चा सुरु आहे.