कामकाजावर बहिष्कार; पायऱ्यांवर गोंधळ, भाजपची अभिरूप विधानसभा उधळली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तालिका अध्यक्षांसोबत गैरवर्तन आणि राडा करणाऱया 12 आमदारांना निलंबित केल्यानंतर भाजप आमदारांनी आज विधिमंडळाच्या पायऱयांवरच अभिरूप विधानसभा भरवली. विधानसभा अध्यक्षांची परवानगी न घेता वाटलेली कागदपत्रे, माईक, स्पीकरचा वापर यामुळे विधिमंडळाच्या नियमांचा भंग झाल्याने विरोधी पक्षांची ही अभिरूप विधानसभा गुंडाळावी लागली. अध्यक्षांच्या आदेशानुसार मार्शलनी ही अभिरूप विधानसभा उधळून लावत माईक, स्पीकर ताब्यात घेतले.

विरोधी पक्षाने आमदारांच्या निलंबनानंतर घातलेला बहिष्कार आजही कायम ठेवला. सकाळपासूनच भाजप आमदारांनी पायऱयांवर बसून सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर अभिरूप विधानसभाच भरविण्यात आली.
आमदार कालिदास कोळंबकर यांना अभिरुपी विधानसभाचे अध्यक्ष करण्यात आले. त्यानंतर विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस बोलायला उभे राहिले.

अधिकारांत हस्तक्षेप

कागदपत्रे सभागृहाच्या पटलात ठेवल्यानंतर भास्कर जाधव यांनी हा मुद्दा उपस्थित केला. विधिमंडळाच्या आवारात अध्यक्षांच्या परवानगीशिवाय कोणतंही कामकाज करता येत नाही. अशा परिस्थितीत विरोधी पक्षाकडून अभिरूप न्यायालय चालवले कसे जाऊ शकते. त्यांना माईक देण्याची परवानगी कुणी दिली? असा सवाल करत त्यांनी विधिमंडळाच्या अधिकारांत हस्तक्षेप खपवून घेणार नाही. त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी केली. नवाब मलिक यांनी माजी आमदारही यात सामील होऊन भाषणे करीत असल्याची बाब समोर आणली. विधानसभेतील सिक्युरिटी काय कामाची असा सवाल केला. तर सुनील प्रभू यांनी सिक्युरिटी इन्चार्जवर कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर तालिका अध्यक्षपदी आलेल्या भास्कर जाधव यांनी हे माईक काढून, हे प्रकार तत्काळ थांबविण्याचे निर्देश मार्शलना दिले. अध्यक्षांच्या आदेशानंतर मार्शल घटनास्थळी पोहोचले.

ही तर आणीबाणी – देवेंद्र फडणवीस

माईक काढला तरी आमचा आवाज बंद केला जाऊ शकत नाही. सरकारच्या विरोधात आम्ही बोलतच राहणार. माध्यमांवर मार्शलकरवी मुस्कटदाबी करण्यात आली आहे. ही आणीबाणी आहे, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.