पुरुषांसाठीही राष्ट्रीय आयोग नेमा!

सामना ऑनलाईन । बल्लिया

राष्ट्रीय महिला आयोगाच्या धर्तीवर पुरुषांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी पुरुष आयोग नेमण्यात यावा अशी मागणी भाजपचे खासदार हरी नारायण राजभर यांनी केली आहे. उत्तर प्रदेशातील घोसी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे खासदार राजभर यांनी रविवारी वार्ताहरांशी बोलताना ही मागणी केली. महिलांसाठी राष्ट्रीय आयोग आहे, मात्र तसा आयोग पुरुषांसाठी नाही. महिलांकडून होणाऱ्या छळामुळे पुरुषही आत्महत्या करताहेत. पुरुषांवर अनेक खेटे गुन्हे नोंदविले जात आहेत असे राजभर यांनी सांगितले.

पुरुष आयोगाची जर स्थापना झाली तर पुरुषांना त्यांच्या न्याय्य मागण्यासाठी मंच उपलब्ध होईल. त्यामुळे पुरुषही आयोगाकडे जाऊन न्याय मागू शकतील असे राजभर म्हणाले. पुरुष आयोगाच्या मुद्दय़ावर आपण लोकसभेतही आवाज उठविला होता, असेही त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमीत शहा यांनी यासंदर्भात आपण पत्रे लिहिल्याची माहिती राजभर यांनी यावेळी दिली.

महिलांच्या तक्रारींचे निवारण करून त्यांना न्याय देण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना केली आहे. आता जर काही लोक पुरुषांसाठीही आयोग स्थापन करण्याची मागणी करीत असतील तर तो त्यांचा हक्क आहे, मात्र माझ्या मते अशा आयोगाची स्थापना करण्याची गरज नाही.

 रेखा शर्मा, अध्यक्षा राष्ट्रीय महिला आयोग