Video – भाजपच्या खासदाराकडून भर सभागृहात शिवीगाळ

भाजपचे खासदार रमेश बिधुडी यांनी लोकसभेत बोलताना अपशब्दांचा वापर केला. त्यांनी बसपाचे खासदार दानिश अली यांना दहशतवादीही म्हटले. चंद्रयान-3 च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल कौतुक करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या चर्चेदरम्यान हा प्रकार घडला. ‘ओय भ*वे… ओय उग्रवादी… क*वे.. ये मुल्ला आतंकवादी है’ अशा शब्दांचा त्यांनी अली यांच्यासाठी वापर केला. त्यांच्या या शब्दांमुळे विरोधकांनी कडाडून आक्षेप घेतला, मात्र तरीही बिधुरी यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.

लोकशाहीचे मंदिर मानल्या जाणाऱ्या संसदेत एका लोकप्रतिनिधीने दुसऱ्या लोकप्रतिनिधीबद्दल उच्चारलेले हे शब्द खटकणारे होते. दानिश अली हे उत्तर प्रदेशातील अमरोहा मतदारसंघातून निवडून आलेले असून त्यांच्याबद्दल वापरण्यात आलेल्या या अपशब्दांबद्दल संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. सिंह यांनी सभागृहात बोलताना म्हटले की जे शब्द उच्चारले गेले ते मी ऐकले असून मी अध्यक्षांना हे शब्द कामकाजातून काढून टाकावे अशी विनंती करत आहे. मी या शब्दांमुळे ज्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत त्या सगळ्यांकडे दिलगिरी व्यक्त करतो असे सिंह म्हणाले. त्यांनी दिलगिरी व्यक्त करताच विरोधकांचा राग काहीसा शांत झाला आणि त्यांनीही बाके वाजवून त्यांच्या या दिलगिरीचा स्वीकार केला.