दलित हनुमानाला मनुवादी रामाने गुलाम बनवले; भाजप खासदाराने तोडले अकलेचे तारे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । लखनौ

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी हनुमान दलित होता असे सांगून आणखी एका वादाला तोंड फोडले होते. त्या वादात शंकराचार्य, बाबा रामदेव, जैन धर्माचे आचार्य निर्भय सागर यांनी आपापली मते व्यक्त केली होती. आता या वादात बहराईच येथील भाजप खासदार सावित्रीबाई फुले उतरल्या असून त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. दलित हनुमानाला मनुवादी रामाने गुलाम बनवले. हनुमान दलित असल्यामुळेच मनुवाद्यांनी त्याला गुलाम बनवल्याचे त्या म्हणाल्या. राम शक्तीहीन होता असे तारेही त्यांनी तोडले आहेत. रामात खरोखरच शक्ती असती तर आतापर्यंत राम मंदिर झाले असते असेही त्या म्हणाल्या. वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असणाऱ्या सावित्रीबाईंनी नवीन वाद ओढवून घेतला आहे. हनुमानाच्या जातीचा मुद्दा योगी यांनी उपस्थित केल्यानंतर भाजप नेते आता जावईशोध लावून वाद ओढवून घेत आहेत.

हनुमान माणूस असून दलित होता. दलित असल्यानेच रामाने त्याला गुलाम बनवले. त्याला अपमानित करण्यात आले. माणूस असूनही त्याला माकडाचा चेहरा दाखवण्यात आला. फक्त दलित असल्यानेच मनुवादी रामाने हनुमानाला अपमानीत केल्याचे त्यांनी सांगितले. दलित आणि मागासवर्गाला माकड म्हणून हिणवले जात होते. माणूस असूनही हनुमानाला माकड दाखवण्याचे काम मनुवादी रामाने केले आहे. त्या काळापासूनच दलितांचा अपमान करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. मनुवादी समाजाने दलितांना कधीही माणसासारखी वागणूक दिली नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

राम मंदिराचा वाद सर्वोच्च न्यायालयात असूनही भाजपकडे दुसरा मुद्दा नसल्याने त्यांच्याकडून निवडणुकांच्या वेळी राम मंदिराचा मुद्दा उपस्थित करण्यात येतो. राम मंदिराची देशाला गरज नाही. राम मंदिर बांधल्याने दलित आणि मागास समाजाचा विकास होणार आहे काय, दलितांची बेरोजगारीची समस्या सुटणार आहे काय असा सवाल करत भाजपने राम मंदिराचे राजकारण थांबवावे असा सल्ला देत त्यांनी भाजपलाच घरचा आहेर दिला आहे. राममंदिर निर्माण झाल्याने फक्त तीन टक्के असलेल्या ब्राह्मणांचाच फायदा होणार आहे. आम्हाला आमचे अधिकार द्या, नाहीतर खुर्ची खाली करा असा इशाराही त्यांनी भाजपला दिला. खासदार सावित्रीवाई फुले यांना हिंदुस्थानी पंरपरेचे ज्ञान नसल्याने त्यांनी अशी बेताल विधाने केल्याचे भाजप प्रवक्ते चंद्र मोहन यांनी सांगितले. सावित्रीबाई यांच्या या विधानाने भाजपमधील अतंर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे.