
महायुतीत सातारची जागा कोणाला? हे अद्यापि गुलदस्त्यात असताना खासदार उदयनराजे भोसले यांनी मात्र लोकसभा लढविण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. परंतु एकीकडे आपण उदयनराजे यांना महत्त्व देत असल्याचे दाखविणाऱया भाजपकडून त्यांच्या उमेदवारीबाबत स्पष्ट संकेतच दिले जात नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
खासदार उदयनराजे भोसले यांचा काल (24 रोजी) वाढदिवस होता. याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी त्यांना जलमंदिर येथे जाऊन शुभेच्छा दिल्या. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या सातारा सभेचाही योग जुळवून आणला गेला. त्याच्यावर कळस म्हणजे, आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातारा येथे जलमंदिरात जाऊन उदयनराजे यांचे अभीष्टचिंतन केले.
या सर्व घडामोडींतून उदयनराजे यांना खूप मोठा सन्मान दिला जात असल्याचे दाखवून देण्यात आले. मात्र, उदयनराजे गेल्या काही महिन्यांपासून सातारा लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्याच्या तयारीला लागले असतानाही भाजपकडून त्याविषयी स्पष्टपणे ग्रीन सिग्नल दिला गेलेला नाही, याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीसंदर्भात फडणवीस यांना पत्रकारांनी छेडले. तरीही त्यांनी उमेदवारीबाबत ग्वाही देण्याचे टाळले. भाजपमध्ये पक्षशिस्त महत्त्वाची असते. महायुतीचे जागावाटप झाल्यावर पक्षश्रेष्ठाr उमेदवारीचा निर्णय घेतात. त्यामुळे उमेदवारीबाबत कधीही घोषणा करता येत नाही, असे सांगत फडणवीस यांनी उदयनराजेंच्या उमेदवारीबाबतचे गूढ कायम ठेवले.
सातारा मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत काही नावांची चर्चा सुरू असल्याबद्दल विचारले असता, ‘अशा चर्चा होत असतात. मीडियातून अशा चर्चा होतात,’ असे सांगत, ‘उदयनराजे यांच्या पाठीशी माझ्या शुभेच्छा कायमच राहतील,’ असे सांगायला ते विसरले नाहीत.
























































