
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कोलकाता येथील कालच्या रॅलीला जाताना ‘देश के गद्दारों को गोली मारो’ अशा घोषणा देणाऱ्या भाजपच्या 3 समर्थकांना पश्चिम बंगाल पोलिसांनी प्रक्षोभक घोषणाबाजीच्या गुह्याखाली अटक केली आहे.
कोलकाता शहरातील न्यू मार्केट पोलीस स्थानकात एका नागरिकाने भाजप कार्यकर्त्यांच्या भडकावू घोषणाबाजीविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्ररीची दखल घेत कोलकाता पोलिसांनी 3 भाजप समर्थकांना ताब्यात घेतले. या कार्यकर्त्यांची नावे ध्रुव बासू, पंकज प्रसाद आणि सुरेंद्र कुमार तिवारी अशी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या तिघांवर भारतीय दंड संहितेच्या चार कलमांनुसार प्रक्षोभक घोषणा दिल्याच्या आरोपावरून अजामीनपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
भाजपने मात्र आपल्या कार्यकर्त्यांनी अशी घोषणाबाजी केल्याचा साफ इन्कार केला आहे. भाजपला बदनाम करण्यासाठी सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने भाजप कार्यकर्त्यांच्या अटकेचा बनाव रचल्याचा आरोप भाजपने केला आहे.
आम्ही अटक केली, दिल्लीत कारवाई का नाही – ममता
अमित शहा यांच्या सभेत ‘गोली मारो’चे नारे देणाऱयांना अटक केल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री, तृणमूल काँग्रेस नेत्या ममता बॅनर्जी यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. दिल्लीतील हिंसाचार हा पूर्वनियोजित नरसंहार आहे. ‘गोली मारो’चे नारे देणाऱयांना आम्ही अटक केली, मग दिल्लीत भडकावू घोषणाबाजी करणाऱया भाजप नेत्यांवर कारवाई का झाली नाही, असा सवाल त्यांनी केला.



























































