
कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपने टिळक कुटुंबीयांना डावलून हेमंत रासने यांना उमेदवारी दिल्यानंतर संतप्त झालेल्या ब्राह्मण समाजाची नाराजी आणखी तीव्रपणे समोर आली आहे. ‘आमचेही ठरले, धडा कसा शिकवायचा, कसबा हा गाडगीळांचा, कसबा हा बापटांचा, कसबा हा टिळकांचा… का काढला आमच्याकडून कसबा… आम्ही ‘नोटा’ दाबणार…’ असे नवे बॅनर्स शहरात झळकले असून, भाजपचे टेन्शन वाढले आहे.
कसबा पेठ पोटनिवडणुकीत मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कुटुंबातील क्यक्तीला उमेदवारी दिली जाण्याची चर्चा होती, मात्र टिळक कुटुंबाला डावलून हेमंत रासने याना उमेदवारी दिल्यामुळे ब्राह्मण समाज तीव्र नाराज झाला. रासने यांना तिकीट दिल्यानंतर मुक्ता टिळक यांचे पती शैलश टिळक यांनीही नाराजी क्यक्त केली होती.
यापूर्वीही काही बॅनर्स झळकले होते. ‘कुलकर्णींचा मतदारसंघ गेला… टिळकांचा मतदारसंघ गेला… आता नंबर बापटांचा का? समाज कुठवर सहन करणार?’ अशा आशयाचे बॅनर कसब्यात लागले होते. हाच धागा पकडून हिंदू महासंघाचे आनंद दवे कसब्याच्या रिंगणात उतरले. पिंपरी-चिंचवडमध्ये जगताप कुटुंबीयांना जो न्याय देण्यात आला, तो न्याय टिळकांच्या कुटुंबियांना कसब्यामध्ये का दिला नाही? पुणे जिह्यात 21 आमदार असताना प्रत्येक समाजाचं चांगल्या प्रकारे प्रतिनिधित्क असताना ब्राह्मण समाजाला का डावललं गेलं? असे सवाल केले जात आहेत.
ब्राह्मण समाजाची नाराजी कायम
नारायण पेठेतील मोदी गणपती येथील नव्या बॅनरची शहरभर चर्चा सुरू आहे. बॅनरवरील मजकूर पाहता ब्राह्मण समाजाने भाजपला थेट इशाराच दिला आहे. ‘आमचेही ठरले… आम्ही ‘नोटा’ दाबणार…’ असा यावरील मजकूर आहे. महाविकास आघाडीचे रविंद्र धंगेकर आणि भाजपचे हेमंत रासने अशी लढत आहे. ‘नोटा’ला मतदान वाढले तर याचा थेट फटका भाजपच्या रासनेंना बसणार हे निश्चित मानले जात आहे.


































































