
पश्चिम बंगाल भाजपमध्ये तिकीट वाटपावरून प्रचंड बेदिली माजली आहे. ज्यांना भाजपची विचारधारा माहिती नाही. अशा सहा महिन्यांपूर्वी पक्षात आलेल्यांवर तिकिटांची खैरात करून निष्ठावंतांना खडय़ासारखे उचलून फेकण्यात आल्याचा आरोप करत अनेक मतदार संघांत भाजप कार्यकर्त्यांनी बंडाचे निशाण उभारले आहे.
विधानसभेच्या एकुण 294 जागांपैकी 282 जागांवरचे उमेदवार भाजपने जाहीर केले आहेत. यापैकी 46 उमेदवार हे 2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजपात आले आहेत. या 46 पैकी 34 उमेदवार हे तृणमुल काँग्रेसमधून आलेले आहेत. भाकपचे सहा, काँग्रेसचे चार आणि फॉरवर्ड ब्लॉक व गोरखा मुक्ती मोर्चाचा एक उमेदवारही सहा महिन्यांपूर्वीच भाजप डेरेदाखल झाला आहे. इतर पक्षातून आलेल्यांसाठी भाजपात पायघडय़ा अंथरल्या असून वर्षानुवर्षें पक्षासाठी झिजणाऱया निष्ठावान कार्यकर्त्यांना अलगद बाजूला सारण्यात आले आहे. यामुळे निष्ठावानांमध्ये असंतोषाचा लाव्हा फुटला आहे. अनेक मतदार संघात भाजपच्या कार्यकर्त्यांनी बंड पुकारले आहे. काही ठिकाणी कार्यकर्त्यांनी प्रचारातून अंग काढून घेतले आहे.
प्रत्येक कार्यकर्त्याला तिकीट देता येत नाही असे सांगून भाजपचे प्रवक्ता समीक भट्टाचार्य यांनी कार्यकर्त्यांनी पक्षाची अडचण समजून घ्यावी असे आवाहन केले आहे. जे कार्यकर्ते पक्ष कार्यालयात तोडफोड करत आहेत, पोस्टर फाडत आहेत ते भाजपचे कार्यकर्ते असूच शकत नाहीत असे भट्टाचार्य म्हणाले.
पुरुलिया, बांकुरा, पूर्व व पश्चिम मिदनापूर, दक्षिण 24 परगणा, हावडा या जिल्हय़ात भाजप कार्यकर्त्यांनी मोठय़ा प्रमाणावर बंडखोरी केली आहे. हावडामध्ये नाराज कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयासमोर धरणे दिले. सोवन चटर्जी व वैशाखी बॅनर्जी यांनी तिकिट न मिळाल्याने भाजपला सोडचिठ्ठी दिली. भाजपने आमचा विश्वासघात केला असे वैशाखी बॅनर्जी यांनी म्हटले आहे.



























































