
‘विकसित भारत संकल्प यात्रे’च्या नावाखाली भाजपकडून गावोगावी प्रचार सुरू असून, ठिकठिकाणी संतप्त नागरिकांकडून हा रथ रोखला जात आहे. काल कोपरगावातील शेतकऱयांनी रथासमोर कांदा फेकून गावातून रथ परत पाठवला होता, तर आज पाथर्डीतील मोहोज देव्हडे गावात संतप्त तरुणांनी ‘मोदी गो बॅक’च्या घोषणा देत रथ परत पाठविला.
गेल्या दहा वर्षांत भाजपने केलेली एकही घोषणा पूर्ण केली नसल्यामुळे सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱयांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्यातच ‘या योजना केंद्र सरकारच्या आहेत की मोदी आणि भाजप यांच्या आहेत,’ असा सवाल करत नागरिक ठिकठिकाणी रथावर लिहिलेल्या ‘मोदी’ या नावाला तीक्र विरोध करत आहेत. काल कोपरगावमध्ये शेतकऱयांनी रथासमोर कांदे ओतून सरकारच्या निर्यात धोरणाचा निषेध करत रथ गावातून बाहेर काढला होता.
आज पाथर्डी तालुक्यातील मोहोज देव्हडे गावात भाजपचा विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ आला होता. यावेळी गावातील तरुण आदिनाथ देव्हडे, गोरख देव्हडे यांनी हा रथ रोखून धरत ‘मोदी गो बॅक’च्या घोषणा दिल्या. तसेच रथासोबत आलेल्या शासकीय कर्मचाऱयांना निघून जाण्यास सांगितले. या रथाच्या अनुषंगाने भाजपचा प्रचार सुरू असून, याचा खर्च नागरिकांच्या खिशातून केला जात आहे. भाजपने गेल्या 10 वर्षांत दिलेले एकही आश्वासन पाळले नाही. कांदा, दूध, कापूस उत्पादकांना अडचणीत आणले आहे. महागाईमुळे जगणे मुश्कील झाले आहे, असा आरोप तरुणांनी केला. यावेळी गोरख देवढे, रावसाहेब देवढे, ऋषिकेश गर्जे, डॉ. आदिनाथ देवढे, भारत देवढे, किरण देवढे, मच्छिंद्र देवढे, लक्ष्मण काळे, कैलास देवढे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.



























































