
विमानांप्रमाणेच आता ट्रक्टर ट्रॉलीमध्येही ब्लॅकबॉक्स व जीपीएस प्रणाली बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने तशी अधिसूचना काढली आहे. याचा मोठा फटका देशातील लाखो शेतकऱ्यांना बसणार आहे. शेतकऱ्यांवर 30 ते 50 हजारांचा आर्थिक भुर्दंड पडणार असल्यामुळे या निर्णयाला तीव्र विरोध होत आहे.
1989च्या केंद्रीय मोटर वाहन कायद्यात बदल करून हे नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार प्रत्येक ट्रक्टरमध्ये जीपीएस ट्रकिंग डिव्हाईस, एआयएस-140 प्रमाणित लोकेशन ट्रकर बसवणे आवश्यक आहे. तसेच अपघाताची नोंद ठेवण्यासाठी ‘इव्हेंट डेटा रेकॉर्डर’ (ब्लॅकबॉक्स) अनिवार्य केले आहे. ट्रॉलीसाठी नवे महागडे मेपॅनिकल कपलिंग व इलेक्ट्रिकल कनेक्टरही लावावे लागणार आहे.
हा शेतकऱ्यांच्या खिशावर दरोडा
ही अधिसूचना म्हणजे शेतकऱ्यांच्या खिशावर दरोडा आहे. ग्रामीण भागात शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या ट्रॅक्टरसाठी ही तांत्रिक साधने पूर्णतः अनावश्यक आहेत. शेतीमध्ये फक्त 10-15 किमी वेगाने वापरला जाणारा ट्रक्टर कुठल्या अपघाताचे रेकॉर्ड ठेवणार? शहरात बसलेले अधिकारी नियम तयार करताना शेतकऱ्यांचे वास्तव विसरतात, असा संताप काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.
हरकत घेता येणार!
केंद्र सरकारने या निर्णयावर हरकती व सूचनाही मागवल्या असून त्यासाठी 18 ऑगस्टची मुदत दिली आहे. या सूचना परिवहन व रस्ते सुरक्षा विभागाच्या अपर सचिवांना परिवहन भवन, संसद मार्ग, नवी दिल्ली – 110001 या पत्त्यावर पाठवता येतील.