
महिलांच्या डब्यातून प्रवास करणाऱया तरुणीवर चोरटय़ाने चोरीच्या हेतूने गळ्यावर ब्लेडने हल्ला केल्याची संतापजनक घटना शुक्रवारी रात्री पश्चिम रेल्वेच्या चर्नीरोड-मरीन लाइन्स स्थानका दरम्यान घडली. या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली आहे. ब्लेड हल्लाप्रकरणी चर्चगेट रेल्वे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद करून तपासासाठी तीन पथक तयार केली आहे.
पीडित तरुणी ही ब्युटिशियनचे काम करत असून शुक्रवारी रात्री ती नेहमीप्रमाणे लोकलने घरी जात होती. रात्री तिने वांद्रे येथून चर्चगेटला जाणारी लोकल पकडली. तेव्हा महिलाच्या डब्यात तरुणी आणि तीन महिला प्रवास करत होत्या. रात्री 12.02 वाजता लोकल चर्नी रोड स्थानकात आल्यावर तीन महिला उतरल्या. तेव्हा ती तरुणी डब्यात एकटीच होती. लोकल मरीन लाइन्सच्या दिशेने जात असतानाच चोरटा त्या डब्यात शिरला. डब्यात कोणी नसल्याचे पाहून त्याने तरुणीच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावण्याचा प्रयत्न केला. लोकल मरीन लाइन्स दरम्यान थांबली असता तरुणीने आरडाओरड केला.
आरडाओरड केल्यानंतर चोरटा हा उडी टाकून पळून गेला. सोनसाखळी हिसकावत असतानाच चोरटय़ाने केलेल्या ब्लेडहल्यात तरुणीला गंभीर दुखापत झाली आहे. शनिवारी सकाळी तरुणी चर्चगेट रेल्वे पोलीस ठाण्यात आली. तिने रात्री घडलेल्या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून चर्चगेट रेल्वे पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. तपासासाठी तीन पथके तयार केली आहेत. सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस त्या हल्लेखोराचा शोध घेत आहेत.
होमगार्ड अंधेरीपर्यंतच होता
रात्रीच्या वेळेस महिलांच्या डब्यात रेल्वे पोलीस आणि होमगार्ड तैनात केले जातात. ब्लेडहल्ल्याच्या घटनेनंतर त्या डब्यात होमगार्ड का नव्हता, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. रेल्वेच्या वेळापत्रकानुसार होमगार्डची डय़ुटी ही अंधेरी रेल्वे स्थानकापर्यंतच होती. अंधेरी स्थानकात डय़ुटी बदल्यानंतर तो होमगार्ड दुसऱया लोकलमध्ये गेल्याचे सूत्रांनी सांगितले.
























































