उच्चदाब वीजवाहिनीच्या स्फोटामुळे मानखुर्दमध्ये सहाजण जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

मुंबईला वीजपुरवठा करणाऱ्या महापारेषणच्या उच्चदाब वीजवाहिन्या मानखुर्द मंडाळे परिसरातून ट्रॉम्बेपर्यंत आल्या आहेत. या वीजवाहिन्यांच्या परिसरात (इंडक्शन झोन)घराची भिंत असल्याने आज सायंकाळी साडेचारच्या सुमारास स्पार्क होऊन झालेल्या स्फोटात सहाजण जखमी झाल्याची घटना मंडाळे एकता नगर येथे घडली. जखमींना तत्काळ गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान या घटनेमुळे मुंबईच्या वीजपुरवठय़ावर कोणताही परिणाम झालेला नाही.

मानखुर्द मंडाळे परिसरात असलेल्या उच्चदाब वीजवाहिन्यांच्या परिसरात अनेक ठिकाणी दुमजली झोपडय़ा आहेत. त्याला खांबावरून जाणाऱया वीजवाहिनीचा स्पर्श होऊन झालेल्या स्फोटामुळे विपुल पाठक (14), धीरज जाधव (14), अरबाज शेख (16), नीलेश जाधव (14), गणेश पवार (22), लता पालेकर (34) हे जखमी झाले आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ धाव घेत जखमींना शताब्दी रुग्णालयात दाखल केले. त्यापैकी चौघांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. अग्निशमन दलाने वीजवाहिनीच्या इंडक्शन झोनमध्ये येणारी भिंत तत्काळ काढली आहे.