
ऑस्ट्रेलियाचा महान क्रिकेटपटू शेन वॉर्न याचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. निधनावेळी वॉर्न थायलंडमध्ये एका हॉटेलवर होता. त्याच्या हॉटेलच्या खोलीत रक्त आढळल्याचं वृत्त आहे.
शेन वॉर्न हा आपल्या मित्रांसोबत या हॉटेलवर थांबला होता. शेन वॉर्न त्याच्या खोलीत बेशुद्धावस्थेत आढळला होता. त्याला हृदयविकाराचा झटका बसला असावा, असा अंदाज बांधून त्याच्या मित्रांनी त्याला सीपीआर पद्धतीने वाचवण्याचा प्रयत्न केला होता.
मात्र, त्यानंतरही त्याला शुद्ध न आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यावेळी रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. शेन वॉर्न याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. तसंच तो अखेरचा जिथे सापडला त्या खोलीची बारकाईने तपासणी करण्यात आली आहे.
तपासणीत या खोलीत रक्त आढळलं आहे. हे रक्त वॉर्नच्या मृतदेहाच्या जागीच आढळलं आहे. थायलंड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेन वॉर्नला जेव्हा हृदयविकाराचा झटका आला त्या आधी त्याला छातीत खूप दुखत होतं. तो अर्धवट बेशुद्ध अवस्थेत आढळल्यानंतर तिथे उपस्थित लोकांनी त्याला सीपीआर (छातीवर हाताच्या पंजांनी दाब देण्याची कृती) दिला. कदाचित सीपीआर देताना वॉर्नच्या तोंडातून रक्त बाहेर पडलं असावं, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी बांधला आहे.
शेन वॉर्न याला हृदयरोग होता. त्यामुळे पोलिसांनी अन्य काही घातपात झाला असण्याची शक्यता फेटाळून लावली होती. रविवारी वॉर्न याच्या मृतदेहाचं शवविच्छेदन होईल, त्यानंतर आलेल्या अहवालात चित्र स्पष्ट होईल, असं पोलिसांचं म्हणणं आहे.



























































