
अत्याधुनिक आणि दर्जेदार शिक्षण, अद्ययावत सुविधा असणाऱया पालिकेच्या सीबीएसई बोर्डाच्या दहा शाळांची प्रवेश प्रक्रिया आज शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोशी यांच्या हस्ते सुरू झाली. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. सीबीएसई बोर्डाच्या शाळा सुरू करणारी मुंबई महानगरपालिका देशातील पहिलीच महानगरपालिका ठरली आहे. या शाळांमध्ये शिशुवर्ग ते सहावीपर्यंत एकेक तुकडी सुरू करण्यात येणार आहे.
मुंबई महानगरपालिकेकडून इयत्ता दहावीपर्यंतच्या शाळा चालवल्या जातात. विद्यार्थ्यांना 27 शालेय वस्तू मोफत दिल्या जात आहेत. पालिका शाळांत 1214 डिजिटल वर्ग सुरू आहेत. या शाळांत ई-वाचनालय, व्यवसाय मार्गदर्शन शिबिरे, बालकोत्सव, पथनाटय़, सहली, शिक्षणोत्सव, संगीत स्पर्धा, श्लोक स्पर्धा अशा विविध उपक्रमांमुळे मुलांच्या गुणवत्तेत दर्जात्मक वाढ होत आहे. मात्र याचदरम्यान पालकांचा इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे कल असल्याने इतर माध्यमांच्या विद्यार्थ्यांच्या संख्येत घट होत आहे. जागतिकीकरणात टिपून राहण्याकरिता व विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आर्थिक दुर्बल घटकांतील पालक सीबीएसई, आयसीएसई मंडळाच्या शाळेत परवडत नसतानाही प्रवेश घेत आहेत. ही बाब लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेने पालिकेच्या सीबीएसई मंडळाच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी ही संकल्पना मांडली होती. या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी जोगेश्वरी पूर्वेकडील पूनमनगर मुंबई पब्लिक स्कूलमध्ये सीबीएसईची शाळा सुरू करण्यात आली होती. या शाळेला मिळालेला प्रतिसाद पाहून सीबीएसई बोर्डाच्या शाळा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला.
17 मार्चपर्यंत प्रवेश घ्या!
सीबीएसई शाळांमध्ये विद्यार्थ्यांना 25 फेब्रुवारी ते 17 मार्च या कालावधीत प्रवेश घेता येणार आहे. ऑनलाईन पद्धतीने हे प्रवेश दिले जाणार आहेत. मात्र ज्यांना ऑनलाइन प्रक्रिया अवघड वाटत असले त्यांच्या मदतीकरिता शाळांमध्ये कर्मचारीही ठेवण्यात आले आहेत. या शाळांमध्ये प्रवेश घेणाऱया विद्यार्थ्यांना लॉटरी पद्धतीने 90 टक्के प्रवेश दिले जाणार आहेत.
तर 5 टक्के प्रवेश महापौरांच्या शिफारशीनुसार व पाच टक्के प्रवेश पालिका कर्मचाऱयांच्या मुलांसाठी राखीव असतील. पालिकेच्या शाळामंधील विद्यार्थ्यांना ज्या सुविधा दिल्या जातात, त्या सर्व सुविधा या मुलांना दिल्या जाणार आहेत. या शाळांमध्ये ज्युनियर के. जी., सीनियर के. जी. व इयत्ता पहिली ते सहावीपर्यंत प्रत्येक वर्गाची एक तुकडी सुरू करण्यात येणार आहे.
या ठिकाणी होणार शाळा
जी-उत्तर – भवानी शंकर रोड शाळा एफ-उत्तर – काणेनगर, मनपा शाळा के-पश्चिम – प्रतीक्षा नगर मनपा शाळा एल – तुंगा व्हिलेज, नवीन इमारत एन – राजावाडी मनपा शाळा एम-पूर्व 2 – अझीझ बाग मनपा शाळा पी-उत्तर – दिंडोशी मनपा शाळा पी-उत्तर – जनकल्याण नवीन इमारत टी – मिठानगर शाळा, मुलुंड एस – हरियाली व्हिलेज, मनपा शाळा विक्रोळी




























































