मास्क घालूनच घराबाहेर पडा, अन्यथा 200 रुपयांचा दंड! पालिकेने वसूल केला 52 लाख रुपयांचा दंड!

कोरोना प्रसाराचा धोका असल्यामुळे मास्क घालूनच घराबाहेर पडावे असे सक्त निर्देश दिले असताना जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून मास्क न घालता फिरणाऱ्यांना पालिकेने चांगलाच दणका दिला आहे. यामध्ये 20 एप्रिलपासून 26 सप्टेंबरपर्यंत 14 हजार 234 जणांवर कारवाई करण्यात आली असून तब्बल 52 लाख 81 हजार 600 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्यामुळे मास्क न घालता फिरू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

शिंकताना किंवा खोकताना नाकावर-तोंडावर रुमाल किंवा मास्क नसल्यास कोरोनाचा विषाणू दुसऱ्याच्या शरीरात प्रवेश करण्याचा धोका असतो. त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी पालिकेने एप्रिलपासून सार्वजनिक ठिकाणी फिरताना मास्क वापरणे अनिवार्य केले आहे. सुरुवातीला मास्क न घालता फिरल्यास एक हजारांचा दंड केला जात होता. आता 10 सप्टेंबरपासून हा दंड 200  करण्यात आला आहे. यानुसार मास्क न घालता फिरणाऱ्यांवर पालिकेचे वॉर्डमधील अधिकारी कारवाई करीत आहेत. शिवाय घनकचरा विभागातील शेकडो कर्मचारीदेखील मास्क न घालता फिरणाऱ्यांवर कारवाई करीत आहेत. ही कारवाई वेगाने आणि परिणामकारकरीत्या करण्यासाठी घनकचरा विभागातील या कर्मचाऱ्यांना 200 रुपये दंडातील 10 टक्के रक्कम देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. मुंबईत 15 सप्टेंबरपासून राबविण्यात येणाऱ्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेत या कारवाईचा वेग वाढवण्यात आला आहे. यामध्ये 200  रुपये दंडाची रीतसर पावतीही नियम मोडणाऱ्याला देण्यात येत आहे. त्यामुळे ‘मास्क घालूनच घराबाहेर पडा, नाहीतर 200 रुपये भरा!’ असा इशाराच पालिकेने या कारवाईतून दिला आहे.

13 सप्टेंबरपासून 9 हजार जणांवर कारवाई

मुंबईत 20 एप्रिल ते 12 सप्टेंबर या कालावधीत 4989 जणांवर कारवाई करण्यात आली असून प्रत्येकी एक हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. यामध्ये पालिकेने 33 लाख 68 हजार 500 रुपयांची वसुली केली आहे.

तर दंडाची रक्कम 200 रुपये केल्यानंतर 13 सप्टेंबर ते 26 सप्टेंबर या कालावधीत तब्बल 9 हजार 245 जणांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून 19 लाख 13 हजार 100 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या